Rahul Tripathi, IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आज राजकोटमध्ये होत आहे. मालिका सध्या बरोबरी असल्याने हा सामना निर्णायक असणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना सामना जिंकणे अपरिहार्य आहेत. अशातच हार्दिकने संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय काही अंशी बरोबर ठरल्याचे दिसून आले. भारतीय संघात गेल्या टी२० सामन्यात पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीने त्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पण आज मात्र राहुल त्रिपाठीने श्रीलंकन गोलंदाजांची हवाच काढून टाकली.
पहिल्या षटकात स्विंग गोलंदाजीवर इशान किशन झेलबाद झाला. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांचा वरचष्मा असेल असे वाटत होते. पण राहुल त्रिपाठीने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. सुरूवाती पासूनच राहुल त्रिपाठी तुफान फॉर्मात दिसला. त्याने स्विंग गोलंदाजांना फारसे सेटल होऊनच दिले नाही. गोलंदाजाने टप्पा टाकला की बॅटने चेंडू सीमारेषेपार पाठवायचा अशा इराद्यानेच तो मैदानात आला होता. अवघ्या १५ चेंडूत ५ चौकार आणि २ सणसणीत षटकार ठोकून त्याने भारताला पॉवर-प्ले मध्ये आघाडी मिळवून दिली. पण त्याच्या एका चुकीने सगळा घात केला.
काय झाली चूक
राहुल त्रिपाठी चांगल्या लयीत होता. पॉवर प्ले चे शेवटचे षटक असल्याने तो चांगली फटकेबाजी देखील करताना दिसत होता. करूणरत्नेला त्याने सरळ रेषेत दोन सणसणीत षटकारदेखील ठोकले. पण त्यानंतर आलेला आखूड टप्प्याचा चेंडू खेळण्यात त्याच्या कडून चूक झाली. त्याने चेंडू अंगावर आल्यानंतर मारण्याऐवजी केवळ त्याला दिशा दिली. षटकात बऱ्याच धावा आल्या असताना आणखी धावा काढण्याच्या नादात तो शॉर्ट थर्ड मॅनकडे झेल देऊन बसला. त्यामुळे १६ चेंडूत ३५ धावा काढून त्याला माघारी परतावे लागले.
दरम्यान, नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे, टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही. श्रीलंकेने मात्र अविष्का फर्नांडोला संघात घेत, त्याच्या जागी भानुका राजपक्षेला संघाबाहेर बसवले आहे.