जोहान्सबर्ग : येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या २०२ धावांवर संपुष्टात आणणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने १८ षटकांत दिवसअखेर १ बाद ३५ अशी मजल गाठली आहे. यजमान संघ अद्याप १६७ धावांनी मागे आहे. कर्णधार डीन एल्गर (११) आणि किगन पीटरसन (१४) खेळपट्टीवर आहेत. या दोघांनी प्रत्येकी एका जीवदानाचा लाभ घेत सावध सुरुवात केली. सलामीवीर एडेन मार्कराम (७) मोहम्मद शमीच्या चेंडूवर पायचीत झाला. अखेरच्या टप्प्यात दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या पायात दुखणे उमळताच त्याला मैदान सोडावे लागले.
पाठदुखीमुळे बाहेर असलेल्या विराट कोहलीची जबाबदारी सांभाळणारा कर्णधार लोकेश राहुल आणि भरवशाचा रविचंद्रन अश्विन याच्या ४६ धावांच्या बळावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद २०२ धावा उभारल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय भारतासाठी कठीण ठरला. मयंक अग्रवाल २६ धावा काढून बाद झाला.
यजमान संघाकडून मार्को जेन्सन याने सर्वाधिक चार तर, डेन ऑलिव्हर आणि कॅगिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
चेतेश्वर पुजारा ३ आणि अजिंक्य रहाणे ० यांचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. दोघे लागोपाठच्या चेंडूंवर ऑलिव्हरचे बळी ठरले. यानंतर राहुल- हनुमा विहारी (२०) यांनी चौथ्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. दरम्यान विहारीला नऊ धावांवर जीवदान मिळाले होते. ऋषभ पंत १७ धावा काढून बाद झाला. अश्विनने आक्रमक खेळून संघाच्या २०० धावा फळ्यावर लावल्या. बुमराह १४ धावांवर नाबाद राहिला.
वॉंडरर्सवर राहुल सहावा कर्णधार
या मैदानावर भारताने पाच सामने खेळले. त्या सर्व सामन्यांत वेगवेगळे कर्णधार होते. सध्या लोकेश राहुल नेतृत्व करत आहे. तो सहावा कर्णधार ठरला. सन १९९२ ला या मैदानावरील पहिल्या सामन्याचे नेतृत्व मोहम्मद अझहरुद्दीनने केले. सन १९९७ ला सचिन तेंडुलकर, सन २००६ ला राहुल द्रविड, सन २०१३ ला महेंद्रसिंग धोनी आणि सन २०१८ ला विराट कोहलीने संघाचे नेतृत्व केले होते. भारताने या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. येथे पाचपैकी दोन सामने जिंकले तर तीन सामने अनिर्णित राहिले.
विहारीला वर्षभरानंतर संधी
हनुमा विहारी वर्षभरानंतर अंतिम एकादशमध्ये खेळत आहे. मागच्यावर्षी जानेवारीत तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर जखमेमुळे न्यूझीलंडविरुद्ध स्थानिक मालिकेत खेळू शकला नव्हता. विहारीला विदेशात तज्ज्ञ फलंदाज मानले जाते. ११ कस टीत त्याच्या ६१४ धावा आहेत.
कारकीर्द वाचविण्यासाठी एक डाव शिल्लक...
दिग्गज सुनील गावसकर यांनी पुजारा आणि रहाणे यांच्याकडे आता कारकीर्द वाचविण्यासाठी आता केवळ एकच डाव शिल्लक असल्याचे सांगितले. पहिल्या डावात दोघेही फ्लॉप झाले. या डावाआधी दोन्ही खेळाडूंवर मोठे दडपण होते.
n लोकेश राहुल भारताकडून कसोटीत नेतृत्व करणारा ३४ वा खेळाडू ठरला. सामन्यात जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. कर्णधार म्हणून कसोटी पदार्पणात ५० हून अधिक धावा करणारा राहुल आठवा भारतीय फलंदाज आहे.
n अजिंक्य रहाणेला बाद करताच डेन ऑलिव्हर याने ५० बळी पूर्ण केले. ऑलिव्हर सर्वांत कमी चेंडूत ५० बळी (१४८६) घेणारा आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज बनला. व्हर्नोन फिलॅन्डर याने १२४० चेंडूत ५० गडी बाद केले होते.
धावफलक
भारत पहिला डाव: लोकेश राहुल झे. रबाडा गो. जेन्सन ५०, मयंक अग्रवाल झे. व्हेरेनी गो. जेन्सन २६, चेतेश्वर पुजारा झे. बावुमा गो. ऑलिव्हर ३, अजिंक्य रहाणे झे. पीटरसन गो. ऑलिव्हर ०, हनुमा विहारी झे. वान दुसेन गो. रबाडा २०, ऋषभ पंत झे. व्हेरेनी गो. जेन्सन.१७, रविचंद्रन अश्विन झे. पीटरसन गो. जेन्सन ४६, शार्दुल ठाकूर झे. पीटरसन गो. ऑलिव्हर ०, मोहम्मद शमी झे. आणि गो. रबाडा ९, जसप्रीत बुमराह नाबाद १४, मोहम्मद सिराज झे. व्हेरेनी गो. रबाडा १, अवांतर: १६, एकूण: ६३.१ षटकात सर्वबाद २०२ धावा. बाद क्रम: १-३६,२-४९,३-४९,४-९१,५-११६,६-१५६,७-१५७,८-१८५,९-१८७,१०-२०२ गोलंदाजी: कॅगिसो रबाडा १७.१-२-६४-३, डेन ऑलिव्हर १७-१-६४-३, लुंगी एनगिडी ११-४-२६-०, मार्को जेन्सन १७-५-३१-४, केशव महाराज १-०-६-०.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गर खेळत आहे ११, एडेन मार्कराम पायचीत गो. शमी ७, किगन पीटरसन खेळत आहे १४, अवांतर : ३, एकूण : १८ षटकांत १ बाद ३५ धावा. बाद क्रम: १-१४, गोलंदाजी : बुमराह ८-३-१४-०, मोहम्मद शमी ६-२.१५-१, मोहम्मद सिराज ३.५-२-४-०, शार्दूल ठाकूर ०.१-०-०-०.
Web Title: Rahul's half-century helped India score 200 runs; Africa at 35
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.