कटक - येथे सुरु असेलल्या पहिल्या टी -20 सामन्यामध्ये राहुलचे अर्धशतक आणि शेवटच्या षटकांत मनीष पांडे आणि धोनीनं केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 180 धावापर्यंत मजल मारली. भारतानं लंकेपुढे विजयासाठी 181 धावांचे आव्हान ठेवलं आहे.
लंकेचा कर्णधार थिसारा परेरानं नाणेफेकीचा कौल जिंकत हवामानाचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि के. एल राहुल यांनी भारातच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली असे वाटत असतानात पाचव्या षटकात रोहित शर्माला मॅथ्यूजनं बाद केलं. रोहित शर्मानं 17 धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर राहुलनं सर्व सुत्रे आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी केली. राहुल-अय्यरनं भारताची धावसंख्या झटपट वाढवली. के. एल राहुलनं दहाव्या षटकात आपलं अर्धशतक साजरं केलं यावेळी त्यानं 34 चेंडूत 50 धावा केल्या. 10 षटकानंतर एक बाद 84 धावा अशा भक्कम स्थितीत असणाऱ्या भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. श्रेयस अय्यर 24 धावांवर बाद झाला. अय्यरनंतर के. एल. राहुलही 61 धावांवर बाद झाल. लागोपाठ दोन विकेट गेल्यामुळे भारताची धावसंख्या थंडावली होती. पण शेवटच्या तीन षटकांमध्ये धोनी आणि पांडेनं चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या 150 च्या पुढे नेहली. 19 व्या षटकांमध्ये मनिष पांडे आणि धोनीनं 21 धावा वसूल करत वेगानं धावसंख्या वाढवली. सुरुवातीला काहीशी संथ फलंदाजी करणाऱ्या धोनीनं 22 चेंडूत 39 धावा केल्या. पांडेनं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत लंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. पांडेनं 18 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले.