नवी दिल्ली : विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमधील द ओव्हलवर ७ ते ११ जूनदरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यात लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळल्यास भारताची फलंदाजी भक्कम होणार असल्याचे मत माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. शास्त्री यांनी राहुलचे यष्टिरक्षक म्हणून समर्थन केले, शिवाय त्याच्या उपस्थितीत फलंदाजी लाइन अप भक्कम होणार असल्याचा दावा केला. राहुलचा इंग्लंडमधील रेकॉर्ड चांगला आहे. मात्र सध्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यांतून बाहेर होता.
कर्नाटकच्या या ३० वर्षांच्या खेळाडूने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डेत नाबाद ७५ धावा ठोकून सामना जिंकून दिला. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत के. एस. भरत यष्टिरक्षणात फ्लॉप ठरत असताना स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘राहुलने काल यष्टीमागे आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केल्यामुळे निवडकर्ते डब्ल्यूटीसी फायनलसाठी त्याचा विचार करतील. राहुल मधल्या फळीत पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. इंग्लंडमध्ये यष्टिरक्षण करताना थोडे मागे उभे राहावे लागते. तेथे फिरकीपटूंची अधिक गरज भासत नाही. आयपीएल सुरू होण्याआधी राहुलने अखेरच्या दोन वन डेत सरस कामगिरी सुरू ठेवल्यास भारतीय संघात त्याचे स्थान पक्के होईल.’
राहुलने इंग्लंडमध्ये नऊ कसोटीत दोन शतके आणि एक अर्धशतकासह ६१४ धावा केल्या. भारत यंदा सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१च्या अंतिम सामन्यात पावसाच्या व्यत्ययात भारताला न्यूझीलंडने पराभूत केले होते.