नवी दिल्ली, दि. 27 - वर्ल्डकप उपविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे 'अच्छे दिन' सुरु झाले आहेत. प्रथमच वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरलेल्या महिला संघावर चहूबाजूंनी शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेतर्फे भारतीय महिला क्रिकेट संघाला 1.30 कोटी रुपयांच्या रोख इनामी रक्कमेचे पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांना रेल्वेमध्ये गॅझेटेड अधिका-याची पदवी देण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध होणा-या अंतिम सामन्याच्या एकदिवस आधी बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाखाचे इनाम जाहीर केले. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला होता. पण अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर 9 धावांनी मात केली आणि भारतीय संघाचे विश्वविजयाचे स्वप्न भंगले.
दरम्यान बुधवारी पत्रकारपरिषदेत बोलताना भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने महिला क्रिकेटला अच्छे दिन सुरु झाल्याचे म्हटले होते. विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या कामगिरीवर मी खूश आहे. एकूणच ही स्पर्धा आमच्यासाठी चांगली ठरली. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेच्यानिमित्ताने खूप चांगले बदल झाले असून आता भारतीय महिला क्रिकेटचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत असे तिने सांगितले.
बुधवारी रात्री अडीचच्यादरम्यान भारतीय संघाचे मुंबईत आगमन झाले. या वेळी संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ‘इंडिया... इंडिया’ अशा घोषणांनी संपूर्ण विमानतळ दणाणून गेले. यानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार मितालीसह संपूर्ण संघ उपस्थित होता.
मितालीने या वेळी म्हटले, ‘‘स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर सर्वांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. तसेच, विश्वचषक पात्रता आणि चौरंगी मालिका खेळल्याचा फायदा झाल्याने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात यश आले.’’
एकूणच स्पर्धेतील कामगिरी पाहता महिला संघाने संपूर्ण देशाचे मन जिंकले. यामुळे आता महिलांच्या आयपीएल स्पर्धेचीही चर्चा होऊ लागली. याबाबत प्रश्न विचारले असता मितालीने म्हटले, ‘‘जर दोन वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला असता, तर कदाचित मी याचे समर्थन केले नसते. परंतु, विश्वचषक स्पर्धेनंतर आता याची शक्यता आहे. ज्या प्रकारे खेळाडूंनी खेळ केला आहे आणि महिला क्रिकेटच्या स्तरामध्ये सुधारणा झाली आहे, ते पाहता महिला क्रिकेट आता वेगळ्या उंचीवर गेले आहे.’’