पुणे - आघाडीच्या ३ फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच पहिल्या डावातील भक्कम धावसंख्येला रेल्वे संघाने शनिवारी चोख प्रत्युत्तर दिले. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रेल्वेने ५ बाद ३३० धावा केल्या होत्या.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ही ‘अ’ गटातील लढत सुरू आहे. यजमान महाराष्ट्राने काल पहिल्या डावात सर्व बाद ४८१ धावा केल्यानंतर पाहुण्या रेल्वेने दिवसअखेर नाबाद ८८ धावांची आश्वासक सलामी दिली होती.
आज रेल्वेच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करीत महाराष्ट्राच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी संघर्ष करायला भाग पाडले. पदार्पणाची प्रथम श्रेणी लढत खेळणारा प्रथमसिंग (७३) तसेच सलामीवीर शिवकांत शुक्ला (६२), नितीन भिले (५६) यांनी अर्धशतके झळकावली. दुसरा सलामीवीर सौरभ वाकसकर (३३) आणि अरिंदम घोष (खेळत आहे ४४) यांनीही उपयोगी योगदान दिल्याने दिवसअखेर रेल्वेने सव्वातीनशेपार मजल मारली. महाराष्ट्रातर्फे चिराग खुराणाने ५० धावांत २ बळी घेतले.
कालच्या बिनबाद ८८ वरून पुढ खेळताना रेल्वेने सलामीवीर वाकसकरला (३३) आज दुसºयाच षटकात गमावले. त्याने कालच्या वैयक्तिक धावसंख्येत एका धावेची भर घातली. चिराग खुराणाने त्याचा त्रिफळा उडविला. दुसरा सलामीवीर शुक्ला याला प्रदीप दाढे याने बाद केल्यानंतर प्रथमसिंग आणि भिले यांनी तिसºया गड्यासाठी १०८ धावांची बहुमोल भागीदारी करीत रेल्वेच्या डावाला चांगलेच स्थैर्य दिले. पदार्पणाची प्रथम श्रेणी लढत खेळत असलेल्या मुकेश चौधरीने भिले याला खुराणाकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली आणि आपला पहिला बळी नोंदविला.
प्रथम सिंग आणि यष्टीरक्षक कर्णधार महेश रावत २५ धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर अरिंदम घोष (खेळत आहे ४४) आणि मनीष राव (खेळत आहे १९) यांनी आजची अखेरची षटके सावधपणे खेळून काढत अधिक पडझड होऊ दिली नाही. रेल्वेच्या फलंदाजरंनी आज ९० षटकांत २४२ धावा केल्या. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असून हा सामना अनिर्णित अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. पाहुणा संघ पहिल्या डावात अद्याप १५१ धावांनी मागे आहे. उद्या पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे कोणता संघ गुण मिळवतो, याबाबत उत्सुकता आहे.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र : पहिला डाव : ४८१.
रेल्वे : पहिला डाव : ११४ षटकांत ५ बाद ३३० (सौरभ वाकसकर ३३, शिवकांत शुक्ला ६२, प्रथमसिंग ७३, नितीन भिले ५६, अरिंदम घोष ४४, महेश रावत १८, मनीष राव १९, चिराग खुराणा २/५०, प्रदीप दाढे १/५६, मुकेश चौधरी १/७१, निकीत धुमाळ १/७२).
Web Title: Railways scored an impressive reply to Maharashtra, 330 in reply to 481, chirag khurna 2 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.