T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील खरी चुरस आता रंगणार आहे. स्पर्धेतील ८ अव्वल संघ सुपर ८ मध्ये उपांत्य फेरीतील जागेसाठी खेळणार आहेत. ग्रुप १ मध्ये आता भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर होईल, तर ग्रुप २ मध्ये अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. सुपर ८ मध्ये प्रत्येक संघ ३ सामने खेळतील आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पण, भारताच्या उपांत्य फेरीच्या मार्गात मोठा अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि हा अंदाज खरा ठरल्यास भारताचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगू शकते.
भारताचे पहिल्या फेरीतील सर्व सामने अमेरिकेत झाले आणि आता ते सुपर ८ गटातील सामन्यांसाठी कॅरेबियन बेटांवर दाखल झाले आहेत. खेळाडूंनी काल बार्बाडोस येथे व्हॉलिबॉल खेळण्याची मजा लुटली. कॅरेबियन बेटांवर थेट सुपर ८ चे सामने खेळण्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढू शकते, परंतु हा खरा त्यांच्या मार्गातील अडथळा नाही. कॅरेबियन बेटांवरील हवामान ही खरी चिंतेची बाब आहे. भारतीय संघाला २० जूनला बार्बाडोस येथे Super 8 मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी आहे. सामन्याच्यादिवशी पावसाची शक्यता १० टक्के आहे, पण याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो.
तशीच परिस्थिती २२ जूनला अँटिग्वा येथे होणाऱ्या भारत-बांगलादेश लढतीत उद्भवण्याचा अंदाज आहे. या सामन्यावर पावसाची शक्यता २० टक्के आहे. २४ जूनच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो कारण येथे पावसाची शक्यता ५० टक्के आहे. त्यामुळे पावसाच्या अवकृपेमुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या मार्गात बरेच अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यात भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता होणार आहेत आणि राखीव दिवस नसल्याने भारतीयांची चिंता वाढू शकते.