तिरुअनंतपुरम - तिसरा आणि अंतिम सामना जिंकत टी-20 मालिका जिंकण्याचा निर्धार करणा-या भारतीय संघासाठी एक चिंतेची एक बातमी आहे. तिस-या सामन्यावर पावसाचं संकट असून, न्यूझीलंडचा पराभव करत मालिका जिंकण्याच्या भारतीय संघ आणि चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडिअममध्ये भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा सामना होणार आहे. ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडिअममधील हा पहिला टी-20 सामना असणार आहे. हा निर्णायक सामना टी-20 मालिकेचा विजयी संघ ठरवणार आहे.
हवामाना खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पावसाच्या काही सरी येऊ शकतात. रविवार ते बुधवारदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव जयेश जॉर्ज यांनी मात्र पाऊस पडला तरी काही वेळातच सामना सुरु करता येऊ शकतो अशी माहिती दिली आहे. पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून नेण्यासाठी अत्याधुनिक ड्रेनिंग सुविधा उपलब्ध असून, पुढील 10 मिनिटात सामना सुरु होऊ शकतो असा दावा केला आहे.
पहिल्यांदाच केरळ आणि ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडिअममध्ये टी-20 सामना पार पडत आहे. 2015 मध्ये याच स्टेडिअमवर नॅशनल गेम्सचं उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पडला होता. जवळपास तीन दशकानंतर तिरुअनंतपुरमध्ये क्रिकेट सामना होणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 25 जानेवारी 1988 रोजी भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान युनिव्हर्सिटी स्टेडिअममध्ये अखेरचा क्रिकेट सामना खेळला गेला होता. विवियन रिचर्ड्स यांच्या नेतृत्वाखाली भारताविरोधातील सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना येथे खेळला गेला होता. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. वेस्ट इंडिजने नऊ गडी राखत भारताचा पराभव केला होता.
या स्टेडिअममद्ये 50 हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. सुरक्षेसाठी 2500 पोलिसांनी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये फक्त मोबाइल फोन घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. दरम्यान सर्वच्या सर्व तिकीटांची विक्री झाली आहे.