बंगळुरु - इंदोरमध्ये झालेल्या तिस-या वनडे सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटनं पराभव करत पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 3-0नं आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. पण चौथ्या वन-डे सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मालिकेत 5-0 असा व्हाईट वॉश देण्याच्या विराटसेन्याच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचं चिन्ह दिसतं आहे. हवामान विभागाने पुढच्या 24 ते 48 तासात बंगळुरुत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या २४ तासात शहराच्या अनेक भागांमध्ये 54 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही टीमला याआधी कोलकातामध्येही पावसाचा सामना करावा लागला होता. पावसामुळे दोन्ही टीमना इनडोअर सराव करावा लागला होता. इंदोरमध्ये झालेल्या तिस-या वनडे सामन्याआधीही पाऊस झाला होता. पण याचा सामन्यावर काही प्रभाव पडला नाही. चेन्नईमध्येही पहिल्या वनडे सामन्याआधीही झालेल्या पावसाने दोन तास खेळात व्यत्यय आला होता. त्यानंतर बॅटींगसाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी खेळ 21 षटकांचा करण्यात आला होता. काल झालेल्या सामन्यात भारतनं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटनं पराभव केला होता. या विजयासह भारत आयसीसीच्या जागतीक वन-डे क्रमवारीत पहिल्या क्रमाकांवर पोहचला आहे. भारताला जर आपलं पहिलं स्थान कायम राखायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 5-0 ने जिंकण गरजेचं आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात पावसाने हजेरी लावू नये अशी प्रार्थना सध्या सर्व क्रिकेटरसिक करतायत.
शेवटच्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा - भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. 5 सामन्याची मालिका भारतीय संघाने सलग 3 विजय मिवळत खिशात घातली आहे. संघात दुखापतग्रस्त अक्षर पटेलने पुनरागमन केले असून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आले आहे. अक्षर पटेल हा चेन्नई एकदिवसीय सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघ व्यवस्थापनाने जडेजाला बोलावून घेतले होते. पण कुलदीप यादव आणि चहल यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे जडेजाला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही.