काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३४ धावांचा यशस्वी पाठलाग करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिकन संघाने टी-२० क्रिकेटमध्ये केली. आज वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तुफानी फलंदाजी करत २५९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना जॉन्सन चार्ल्सच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत २५८ धावा कुटल्या. मात्र क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान १८.५ षटकांतच पार केले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाला ब्रँडन किंगच्या रूपात पहिला धक्का बसला. मात्र केल मायर्स (५१) आणि जॉन्सन चार्ल्स यांनी तुफानी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्यांनी १३५ धावांची भागीदारी करत १० षटकांतच वेस्ट इंडिजला १३७ धावांपर्यंत मजल मारून दिली. मायर्स बाद झाल्यावर ११८ धावांची खेळी करणाऱ्या चार्ल्सने आफ्रिकन गोलंदाजांची कुटाई सुरू ठेवली. त्याने १० चौकार आणि ११ षटकार खेचले. अखेरच्या षटकांमध्ये रोमारियो शिफर्ड याने ४१ धावा कुटत वेस्ट इंडिजला २० षटकांणमध्ये ५ बाज २५८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
मात्र दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी हे आव्हान अगदीच किरकोळ ठरवले. क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांनी विस्फोटक फलंदाजी करताना पहिल्या सहा षटकांमध्येच १०० धावा कुटून काढल्या. त्यानंतर या दोघांनी दहाव्या षटकात संघाला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. दरम्यान, क्विंटक डी कॉक ४४ चेंडूत १०० धावांची खेळी करून बाद झाला. मात्र हेंड्रिक्स ६८, रिली रोसू १६, मार्क्रम ३८ आणि क्लासेन १६ यांनी कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई करत हे लक्ष्य अगदी सहजपणे १९ व्या षटकामध्येच गाठले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवला गेलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तर आज शतकी खेळीदरम्यान, क्विंटन डी कॉकने १५ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून केली गेलेली ही सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी ठरली आहे.