गॉल : कायल मायर्स आणि जेसन हॉल्डर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या ६३ धावांची भागीदारी आणि त्यानंतर रहकीम कॉर्नवेलने केलेल्या ३९ धावांच्या भरवशावर वेस्ट इंडिज फॉलोऑन वाचविण्यात यशस्वी ठरली. तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने ९ बाद २२४ धावा केल्या आहेत. त्यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या पहिला सामन्यात श्रीलंकेला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे तिसऱ्या दिवशी केवळ ३८ षटकांचा खेळच होऊ शकला.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३८६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यांच्याकडे आता १६२ धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा वेस्ट इंडिजने ६ बाद ११३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. खेळाच्या पहिल्या तासात मायर्स आणि होल्डर यांनी सावध सुुरुवात केली. मात्र, धनंजय डिसिल्वाने मायर्सला ४५ धावांवर बाद करत ही भागीदारी फोडली. यानंतर, प्रवीण जयविक्रमाने होल्डरचा पत्ताही साफ केला.
कॉर्नवेलने एक बाजू लावून धरत ३९ धावांची खेळी केली. मात्र, सुरंगा लकमलने त्याला बाद करत, वेस्ट इंडिजला नववा धक्का दिला. यानंतर, आलेल्या पावसामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून जयविक्रमा आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.