T20 World Cup 2022 चा सुपर-12 टप्पा आता अंतिम वळणावर पोहोचला आहे. मंगळवारी, अफगाणिस्तान या स्पर्धेमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. आता अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठण्याची कोणतीही शक्यता शिल्लक राहिलेली नाही. अफगाणिस्तानचा श्रीलंकेकडून ६ विकेट्सने पराभव झाला. त्यातही पावसाचा अफगाणिस्तानला फटका बसला आणि त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. श्रीलंकेने मात्र हा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे.
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी कशी होती?
अफगाणिस्तानला यावेळी सुपर-12 मध्ये थेट प्रवेश मिळाला होता, पण त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही. T20 विश्वचषक 2022 मध्ये, अफगाणिस्तानने आतापर्यंत ४ सामने खेळले. त्यातील २ सामन्यांत त्यांचा पराभव झाला तर २ सामने पावसात वाहून गेले. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानला २ गुण मिळाले, केवळ सामने रद्द झाल्यामुळेच मिळाले. आता त्यांचा एक सामना बाकी आहे, तो सामना जरी त्यांनी जिंकला तरी त्यांचे एकूण गुण ४ होतील. म्हणजेच अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेवटचा सामना ही त्यांची केवळ औपचारिकता राहील.
T20 विश्वचषक 2022 मध्ये अफगाणिस्तान
इंग्लंडविरूद्ध - ५ विकेट्सनी पराभूत
न्यूझीलंडविरुद्ध - पावसामुळे सामना रद्द (१ गुण)
आयर्लंडविरूद्ध - पावसामुळे सामना रद्द (१ गुण)
श्रीलंकाविरूद्ध - ६ विकेट्सनी पराभूत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध - ४ नोव्हेंबरला रंगणार सामना
पावसाने अफगाणिस्तानची लावली वाट
असोसिएट संघांबद्दल बोलायचे झाले तर अफगाणिस्तान त्यांच्यामध्ये सर्वात मजबूत मानला जात होता, त्यामुळेच सुपर-12 संघांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात ८ संघांचा समावेश होता. मात्र टी२० वर्ल्ड कपमध्ये पाऊस त्यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरला. अफगाणिस्तानला आयर्लंड किंवा श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकण्याची संधी होती, कारण उर्वरित दोन सामने इंग्लंड, न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांशी होते. मात्र पावसाने त्यांचा खेळ बिघडवला. त्यामुळे आता ते वर्ल्डकपमधून बाहेर पडले आहेत.
Web Title: Rain spoils Afghanistan Campaign in T20 World Cup 2022 AFG out of tournament after losing to Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.