नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची जिवलग मैत्री सर्वश्रुत आहे. मैदान आणि मैदानाबाहेर दोघांचे विचार सारखे दिसतात. धोनीने १५ ऑगस्टच्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताच काही मिनिटात रैनानेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
२०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना आणि २०१५ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. धोनीच्या नेतृत्वात रैना टीम इंडियासाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतो. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आम्ही दोघे कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून त्या सायंकाळी ढसाढसा रडलो, असे रैनाने सांगितले.
रैना म्हणाला, ‘चेन्नईला पोहोचताच धोनी निवृत्तीची घोषणा करणार याची मला कल्पना होतीच. त्यामुळे मीसुद्धा तयारीतच होतो. मी, पीयूष चावला, दीपक चहर आणि करण शर्मा आम्ही १४ आॅगस्टला रांचीला पोहोचलो. तिथे धोनी आणि मोनू सिंह हे दोघे आमच्यासोबत चार्टर्ड विमानात बसले आणि आम्ही चेन्नईला रवाना झालो. मी, पीयूष, अंबाती रायडू, केदार जाधव आणि करण शर्मा आम्ही सारे धोनीसोबत एकत्र बसलो होतो. आमच्या कारकिर्दीबाबत आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करत होतो. तेव्हाच आम्ही निवृत्तीची घोषणा केली. त्या घोषणेनंतर आम्ही एकमेकांना अक्षरश: मिठी मारून ढसाढसा रडलो. पण नंतर मात्र आम्ही भावनांना आवर घातला आणि रात्री पार्टीदेखील केली.’ ‘आम्ही दोघांनी आधीपासूनच शनिवारी निवृत्ती घेण्याचे ठरवले होते.
धोनीचा टी शर्ट क्रमांक ७ आहे आणि माझ्या टी शर्टचा क्रमांक ३ आहे. दोन्ही मिळून ७३ होतात. शनिवारी भारताच्या स्वातंत्र्याला ७३ वर्षे पूर्ण झाली. हा ७४ वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी या दिवसाची निवड केली,’ असेही रैनाने सांगितले. (वृत्तसंस्था)
>आधी निवृत्ती नंतर सूचना : वन डे क्रिकेटचा भरवशाचा खेळाडू ३३ वर्षांचा सुरेश रैना याने निवृत्तीच्या एक दिवसानंतर निवृत्तीची अधिकृत माहिती आपल्याला दिल्याचे बीसीसीआयने सोमवारी स्पष्ट केले. १५ आॅगस्ट रोजी धोनीसोबतच रैनाने निवृत्ती जाहीर केली होती. खरेतर खेळाडू निवृत्तीआधी बोर्डाला सूचना देतात. रैनाने १३ वर्षांच्या कारकिर्दीत १८ कसोटी, २२६ वन डे आणि ७८ टी-२० सामने खेळले. काहीवेळा त्याने नेतृत्वही केले होते.बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रैनाच्या योगदानाचे कौतुक करीत कौशल्य आणि प्रतिभेचा धनी असलेला खेळाडू, असे संबोधले आहे. युवराजच्या सोबतीने भारतीय संघाच्या मधल्या फळीला भक्कम करण्यात रैनाचा मोठा वाटा राहिल्याचे गांगुली यांनी म्हटले आहे. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी रैनाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Web Title: Raina, Dhoni cried loudly after announcing retirement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.