केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा सुरेश रैनाला भारतीय वन-डे संघात पुनरागमनाची आस लागली आहे. या मालिकेतील कामगिरीत आयपीएलसह आगामी स्पर्धांमध्ये सातत्य राखण्यात यश येईल, अशी आशा रैनाने व्यक्त केली. रैनाने शनिवारी तिस-या टी-२० मध्ये २७ चेंडूंना सामोरे जाताना ४३ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त त्याने ३ षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. रैनाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने या लढतीत ७ धावांनी विजय मिळवताना मालिकेत २-१ ने सरशी साधली.
रैना म्हणाला,‘पुनरागमन करताना चांगली कामगिरी होणे महत्त्वाचे आहे. यानंतर श्रीलंका दौरा असून त्यानंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे. आम्हाला बरेच सामने खेळायचे आहे. यापूर्वीही विश्वकप संघात खेळलो असून २०११ मध्ये जेतेपद पटकावणा-या संघाचा सदस्य होतो. ती माझ्यासाठी पहिली विश्वकप स्पर्धा होती आणि जेतेपदाचा मान मिळवला होता.’ रैना पुढे म्हणाला,‘वन-डे क्रिकेटबाबत चर्चा करताना मी पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे. काही लढतींचा प्रश्न असून मी लवकरच वन-डे संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेन, असा विश्वास आहे. ’
रैनाने यापूर्वी अखेरचा वन-डे आंतरराष्ट्रीय सामना आॅक्टोबर २०१५ मध्ये मुंबई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. येथे पुनरागमन करण्यापूर्वी त्याने अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. रैना म्हणाला,‘कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाचा खेळ बघितल्यानंतर एक संघ म्हणून दक्षिण आफ्रिकेत आम्ही काय मिळवू शकतो, हे दिसून येते. यापूर्वी एकाही संघाला हे साध्य झाले नाही. ड्रेसिंग रुममधील आत्मविश्वासामुळे आम्हाला मैदानावर खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे सामना जिंकता आला. आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये चांगला मारा केला. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. टी-२० क्रिकेटमध्ये मैदानावर तुमची देहबोली कशी आहे, याला अधिक महत्त्व असते. तिसºया क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाल्याचा लाभ झाला.
इंग्लंड व आॅस्ट्रेलिया दौ-यांसाठी सज्ज : भुवनेश्वर
भारतीय संघाची दक्षिण आफ्रिका दौ-यातील कामगिरी यंदा होणा-या इंग्लंड व आॅस्ट्रेलिया दौ-यासाठी भारतीय संघ सज्ज असल्याची प्रचिती देणारी असल्याचे भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. भुवनेश्वर म्हणाला,‘आम्ही दोन चषकांसह खूश आहोत. भविष्यात सर्वंच चषक पटकावण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. हा दौरा शानदार ठरला, विशेषत: कसोटी मालिका. आम्ही दोन सामने गमावले असले तर पराभवामध्ये अधिक अंतर नव्हते. आम्ही ०-३ ने पराभूतही होऊ शकलो असतो किंवा २-१ ने विजयही मिळवता आला असता. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला असून इंग्लंड व आॅस्ट्रेलिया दौ-यात चमकदार कामगिरीसाठी सज्ज आहोत. ’
Web Title: Raina hoping to make ODI comeback after strong T20 show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.