लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोन ऑस्ट्रेलियन्स फलंदाजांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने दणदणीत विजय मिळवत राजस्थान रॉयल्सला ८ गड्यांनी नमवले. यासह दिल्लीने प्ले ऑफ फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या असून पराभवानंतरही राजस्थानने तिसरे स्थान कायम राखले आहे.
डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थानने दिलेल्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. परंतु यानंतर वॉर्नर-मार्श यांनी १०१ चेंडूंत १४४ धावांची तडाखेबंद भागीदारी करत राजस्थानच्या हातातून सामना हिसकावून घेतला. दोघांच्या विशेष करून मार्शच्या आक्रमकतेपुढे राजस्थानला पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही. १८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर युझवेंद्र चहलने मार्शला बाद केले खरे, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
त्याआधी, प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक असलेल्या दिल्लीने दमदार गोलंदाजी करताना राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले. प्रमुख फलंदाज अपयशी ठरले, परंतु रविचंद्रन अश्विनने झळकावलेल्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने समाधानकारक मजल मारली. अश्विनला देवदत्त पडिक्कलने चांगली साथ दिली. चेतन सकारिया, ॲन्रीच नॉर्खिया आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ बळी घेत राजस्थानच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यशस्वी जैस्वाल, जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन अपयशी ठरल्याने राजस्थान अडचणीत आले. अश्विन-पडिक्कल यांनी ३६ चेंडूंमध्ये ५३ धावांची भागीदारी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला.
निर्णायक क्षणधावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच चेंडूवर पहिला बळी गेल्यानंतर वॉर्नर-मार्श यांनी केलेली शतकी भागीदारी निर्णायक ठरली.
मॅजिकल मोमेंटनवव्या षटकात युझवेंद्र चहलविरुद्ध खेळताना डेव्हिड वॉर्नर चकला. यावेळी चेंडू यष्टीला लागला, मात्र बेल्स पडल्या नाहीत. विशेष म्हणजे चेंडूचा स्पर्श झाल्यानंतर यष्टींची लाइटही पेटली, पण बेल्स न पडल्याने वॉर्नरला जीवदान लाभले.