कोलकाता : गेल्या लढतीत विजय मिळवत आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी विजयाची हॅट््ट्रिक साजरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपले अस्तित्व कायम राखण्यास उत्सुक आहेत. ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या लढतीत पराभूत संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल.
प्ले आॅफमध्ये दोन संघ निश्चित झाले असून दोन संघांना संधी आहे. त्यात केकेआर व रॉयल्स यांच्यासह पाच संघांचा समावेश आहे. उभय संघांच्या खात्यावर १२ गुणांची नोंद असून दोन्ही संघाला गेल्या काही लढतींमध्ये सूर गवसला आहे.
सलग दोन सामने गमाविल्यानंतर केकेआरने आयपीएलची चौथी सर्वोच्च धावसंख्या ६ बाद २४५ धावा फटकावित गेल्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचा ३१ धावांनी पराभव केला. त्याचप्रमाणे स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रॉयल्सने सलग तीन विजय मिळवले. या तिन्ही विजयांमध्ये बटलरने मुख्य भूमिका बजावली.
सलामीवीर बटलरच्या नाबाद ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल्सने रविवारी मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या यष्टिरक्षक फलंदाजाचे सलग पाचवे अर्धशतक होते. त्याने वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी साधली.
गेल्या पाच डावांमध्ये बटलरने ६७, ५१, ८२, नाबाद ९५ आणि नाबाद ९४ धावा केल्या आहेत. केकेआरसाठी बटलर व बेन स्टोक्स यांना रोखणे आवश्यक राहील.
कर्णधार अजिंक्य रहाणे फॉर्मात नसून त्याचा लाभ घेण्यास केकेआर संघ प्रयत्नशील राहील. राऊंड रॉबिन टप्प्यात केकेआरची ईडन गार्डन्सवरील ही अखेरची लढत आहे.
ईडन गार्डन्सवर एलिमिनेटर व दुसरा प्ले आॅफ सामना होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत तिसºया व चौथ्या स्थानावर राहिल्यात त्यांना या मैदानावर खेळण्याची संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)
>केकेआरचे फलंदाज सुनील नरेन, दिनेश कार्तिक व शुभमान गिल चांगल्या फॉर्मात आहेत. नरेनने इंदूरमध्ये ३६ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या, तर कार्तिकने २३ चेंडूत ५० धावा चोपल्या. यावेळी नरेन व बटलर यांच्यातील लढत अनुभवता येईल. कर्णधार दिनेश कार्तिकने ३७१ धावा केल्या असून तो लय कायम राखण्यासाठी उत्सुक असेल. उभय संघांदरम्यान आतापर्यंत १४ सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी सात विजय मिळवले आहे. त्यामुळे मंगळवारी चाहत्यांना रंगतदार लढत बघण्याची संधी मिळेल.
Web Title: Rajasthan-KKR will fight today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.