मुंबईः मुंबई इंडियन्सच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेत राजस्थानला 'रॉयल' विजय मिळवून देण्याची किमया कृष्णप्पा गौतमनं रविवारी केली. स्वाभाविकच, नेटकऱ्यांमध्ये त्याच्या खेळीची जोरदार चर्चा आहे. पण, याच कृष्णप्पानं गेल्या वर्षी बीसीसीआयची फसवणूक केली होती आणि त्याची शिक्षाही त्याला भोगावी लागली होती, हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल.
त्याचं झालं असं की, गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात कृष्णप्पा इंडिया रेड संघाकडून खेळला होता. पाच विकेट्स घेऊन त्यानं विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यानंतर, टायफॉइड झाल्याचं सांगत तो तातडीने बेंगळुरूला गेला होता. पण घरी जाऊन विश्रांती वगैरे न घेता तो कर्नाटक प्रीमिअर लीग खेळायला मैदानात उतरला होता. हे बीसीसीआयला कळताच त्यांनी कृष्णप्पावर बंदीची कारवाई केली होती. दुलीप ट्रॉफी आणि भारत अ संघाची दारं त्याच्यासाठी बंद झाली होती. शेवटी, बऱ्याच गयावया केल्यावर, माफी मागितल्यावर ही बंदी हटवण्यात आली होती.
या प्रकरणानंतर, ऑफ स्पिनर कृष्णप्पाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. २०१७ मध्ये झालेल्या रणजी सामन्यात त्यानं उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन केलं होतं. आठ सामन्यात त्यानं ३४ विकेट्स मिळवल्या होत्या. तसंच, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावून त्यानं आपलं फलंदाजीतील कौशल्यही सिद्ध केलं होतं.
कृष्णप्पाला लागली लॉटरी!
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कृष्णप्पाच्या पराक्रमांची दखल घेऊनच, आयपीएल-११ साठी झालेल्या लिलावात, त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स चुरस रंगली होती. त्यात ६ कोटी २० लाख रुपयांची बोली लावून राजस्थाननं बाजी मारली होती. कृष्णप्पाला मिळालेली ही किंमत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, मुंबईविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात ११ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची देधडक खेळी करून त्यानं आपली ताकद दाखवून दिली आहे.