आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळुहळू कमी होईल आणि त्याची जागा फ्रँचायझी लीग घेईल, असं भाकित अनेक माजी क्रिकेटपटूंनी केलं आहे. इंडियन प्रीमिअर लीग, बिग बॅश, ब्लास्ट ट्वेंटी-२०, कॅरेबियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग, लंकन प्रीमिअर लीग, दक्षिण आफ्रिका, युएई, अमेरिका आदी ट्वेंटी-२० लीग येतच आहेत... जगातील अनेक खेळाडू फक्त याच लीगमधून खेळून कोट्यवधी कमावत आहेत. वेस्ट इंडिजचे बरेच दिग्गज राष्ट्रीय संघाकडून खेळण्यापेक्षा फ्रँचायझी लीगमध्येच खेळत आहेत. फ्रँचायझी लीगमधून मिळणारी तगडी रक्कम, ही त्याला कारणीभूत आहे. आता आयपीएल फ्रँचायझीकडून इंग्लंडच्या खेळाडूंना मोठी रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय संघाकडून खेळण्याऐवजी फ्रँचायझीच्या विविध लीगमधील संघाकडून खेळण्यासाठी करार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर ( Jos Buttler) यालाही अशीच तगडी ऑफर मिळाली आहे. २००८चे आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्सकडून त्याला चार वर्षांची ऑफर मिळाली आहे आणि त्यासाठी फ्रँचायझी मोठी रक्कम मोजायला तयार आहेत. आयपीएल शिवाय या फ्रँचायझीची दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये पार्ल रॉयल्स नावाची टीम आहे. बटलरने अद्याप ही डील मान्य केलेली नाही, परंतु त्याला वर्षाला १० कोटी असा प्रस्ताव RR ने दिलाय. आयपीएल २०२३ मध्ये RR ने १० कोटींत बटलरला संघात कायम राखले होते. २०१८पासून तो या संघाचा सदस्य आहे आणि त्याने ७१ सामन्यांत ५ शतकं व १८ अर्धशतकं झळकावली आहेत.
आयपीएल २०२५ च्या लिलावातही RR या खेळाडूला संघात कायम राखतील याची खात्री आहे. २०१९चा वन डे वर्ल्ड कप आणि २०२२ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना अधिक मागणी होत आहे. जेसन रॉयने नुकतेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा करार नाकारून MLC लीगमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली. मोईन अली पुढील वर्षी टेक्सास सुपर किंग्ससाठी ECBचा करार नाकारण्याची शक्यता आहे. अशाच करारासंदर्भात मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चरशी चर्चा करत असल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिले आहे.