इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याला आपल्या ताफ्यात घेऊन मोठा डाव खेळला. राजस्थान रॉयल्सही ( Rajasthan Royals) माजी खेळाडू जोफ्राला घेण्यासाठी सज्ज होते, परंतु माजी विजेत्या मुंबईने कुरघोडी केली. पण, RRने त्याला आता उत्तर दिले. आयपीएल २०२२च्या साखळी फेरीतील लढती महाराष्ट्रात होणार असल्यामुळे RRने त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल केला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा सर्वात भरवशाचा खेळाडू पळवला. RRने आयपीएल २०२२साठी त्यांच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लसिथ मलिंगा ( Lasith Malinga) याची नियुक्ती केली आहे. तो कुमार संगकारासह RRसाठी काम करणार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार मलिंगाने २०१४ मध्ये आयसीसीची ट्रॉफी उंचावली होती. ३८ वर्षीय श्रीलंकन गोलंदाज आता RRसाठी युवा गोलंदाज घडवण्याचं काम करणार आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा RR ला मुंबई-पुण्यात होणाऱ्या सामन्यासाठी होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. मलिंगा म्हणाला,''आयपीएलमध्ये पुनरागमन झाल्याचा आनंद होतोय आणि RRसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे मी भाग्य समजतो. या संघाने नेहमीच युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मुंबई इंडियन्ससोबत या लीगमध्ये खेळतानाच्या माझ्या काही खास आठवणी आहेत आणि आता मी रॉयल्स कुटुंबाचा सदस्य झालो आहे.''