२०१३नंतर पहिल्यांदा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार नाही. Virat Kohli ने २०१३ ते २०२१ या कालावधीत सलग RCBच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली. पण, मागच्या पर्वाच्या सुरूवातीलाच त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ८ वर्षांत विराटला आयपीएलची ट्रॉफी उंचावता आली नाही.
मागच्या वर्षी विराटने भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर BCCIने वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवानंतर विराटने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले. आता टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. आयपीएलमध्ये RCBचे नेतृत्व यंदा फॅफ ड्यू प्लेसिस करणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आता RCBचे नेतृत्व सांभाळणार आहे आणि फ्रँचायझीच्या या निर्णयाचे राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन याने स्वागत केले, परंतु त्यानं पुढील वर्षी RCB पुन्हा विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवू शकतात, असा अंदाजही व्यक्त केला.
तो पुढे म्हणाला,''मागील काही वर्षांत विराट कोहली कर्णधार म्हणून प्रचंड दडपणाखाली गेला होता. यंदाचे वर्ष हे त्याचे त्या दडपणातून विश्रांतीचे आहे आणि पुढील वर्षी माझ्या मते RCB पुन्हा विराटकडे नेतृत्वाची जबाबदारी देऊ शकतात.''
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBने ६४ सामने जिंकले आहेत, तर ६९ सामने गमावले आहेत. RCBचा पहिला मुकाबला २७ मार्चला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.