Rajasthan Royals, IPL 2022 Qualifier 2 RR vs RCB: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सच्या संघाने यंदाच्या हंगामात आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. राजस्थानचा संघ साखळी फेरी संपताना गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांनी १४ पैकी ९ सामने जिंकत ही किमया साधली होती. पण प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्स संघाने ७ गड्यांनी धूळ चारली. त्यामुळे आता त्यांना यंदाच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरूद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. याच दरम्यान, राजस्थानला एक मोठा धक्का बसला असून त्यांचा स्टार परदेशी खेळाडू बायो-बबल सोडून मायदेशी परतला आहे.
राजस्थानच्या ताफ्यातील स्टार ऑलराऊंडर डॅरेल मिचेल याने राजस्थान रॉयल्सचं बायो-बबल सोडलं असून तो मायदेशी परतला आहे. राजस्थानच्या संघाचा आज RCB विरूद्ध 'करो या मरो'चा सामना असूनही त्याने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय संघासोबत आगामी मालिकेला रवाना होण्यासाठी त्याने हा कठोर निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्या मालिकेसाठी डॅरेल मिचेलला न्यूझीलंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
राजस्थानने गुजरात विरूद्ध खेळलेल्या प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग-११ मध्ये स्थान देण्यात आलेले नव्हते. साखळी सामन्यातदेखील त्याला केवळ दोन सामन्यात संधी मिळाली, पण त्यातही त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. राजस्थानच्या संघातील एखादा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला असता तर डॅरेल मिचेलला संघात स्थान द्यावे लागलं असतं. पण अशा परिस्थितीतही त्यांच्याकडे जेम्स नीशमचा पर्याय उपलब्ध असल्याने डॅरेल मिचेलला संघात संधी मिळणं कठीणच होतं.
राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय, करुण नायर, जेम्स नीशम, रासी वॅन डर डुसेन, कॉर्बिन बॉश, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, तेजस बारोका, कुलदीप यादव, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल