दुबई : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज मंगळवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. दोन्ही संघांकडे आक्रमक फलंदाज असल्याने क्रिकेटप्रेमींना या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाहण्यास मिळेल. लियाम लिव्हिंगस्टोन, एविन लुईस हे राजस्थानकडून, तर पंजाबकडून ख्रिस गेल आणि लोकेश राहुल चौफेर फटकेबाजीसाठी सज्ज असतील.आतापर्यंत या दोन्ही संघांना अपेक्षित कामगिरी करण्यात यश आलेले नाही. लोकेश राहुलला केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात पंजाबचा कर्णधार म्हणूनही छाप पाडावी लागेल. नुकताच द हंड्रेड स्पर्धेत छाप पाडलेल्या लिव्हिंगस्टोनकडून राजस्थानला मोठी अपेक्षा असेल. विंडीजच्या लुईसकडूनही आक्रमक खेळीची राजस्थानला आशा असेल. दोघांच्या जोडीला कर्णधार संजू सॅमसन आहेच. यूएईमध्ये गेल्यावर्षी आयपीएलमध्ये त्याने चांगलीच फटकेबाजी केली होती. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्याचे मुख्य आव्हान त्याच्याकडे असेल.पंजाबची कमकुवत गोलंदाजी राजस्थानसाठी फायदेशीर ठरेल. मोहम्मद शमीचा अपवादवगळता त्यांच्याकडे नावाजलेला गोलंदाज नाही. पंजाबसाठी आदिल राशिद व युवा रवि बिश्नोई निर्णायक ठरू शकतील. राजस्थानसाठी विदेशी खेळाडू म्हणून ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिल्लर आणि यंदा संघात नव्याने आलेला आयसीसी टी-२० क्रमवारीतील अव्वल गोलंदाज तबरेझ शम्सी यांच्याकडे लक्ष असेल. याशिवाय, राहुल तेवटिया, रियान पराग, जयदेव उनाकडट व चेतन सकारिया यांनीही छाप पाडली आहे.
पंजाबकडून डावाची सुरुवात राहुल आणि मयांक अग्रवाल करण्याची शक्यता असली तरी राजस्थानसाठी मुख्य आव्हान ठरेल तो ख्रिस गेल. गेल ५-६ षटके जरी टिकला, तरी पंजाबच्या भक्कम धावसंख्येचा पाया रचला जाईल.