राजस्थान रॉयल्सचा आयपीएल 2020मधील ( Indian Premier League) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत शारजाहमध्ये 22 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. मात्र या पहिल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारासह तीन महत्वाचे खेळाडू चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे चेन्नईला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथसह अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि विकेटकिपर जोस बटलर चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधातील पहिला सामना खेळू शकणार नाही. जोस बटलरला यूएईमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे तो पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती खुद्द स्वत:नेच दिली आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे बेन स्टोक्स आपल्या कुटुंबासोबत क्राइस्टचर्चमध्ये आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तो उपलब्ध नसणार आहे.
View this post on InstagramSee how Jos is getting on in quarantine and his thoughts on this year's IPL #Hallabol
A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals) on
राजस्थानचा कर्णधार स्टीव स्मिथ देखील दुखापतग्रस्त आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना नेट प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्मिथ तीन वनडे मॅचमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच याच कारणामुळे स्मिथ आयपीएलमध्ये होणाऱ्या राजस्थानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्मिथच्या अनुपस्थितीत विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनकडे कर्णधार पदाची धुरा जाऊ शकते.
दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आयपीएलच्या १३व्या पर्वाची दणक्यात सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी आणि गतविजेते मुंबई इंडियन्सला ५ विकेट्सनी नमवले. प्रतिकूल परिस्थितीमध्येही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त दबाव न घेता अंबाती रायुडू आणि फॅफ डूप्लेसिस या अनुभवी फलंदाजांनी संयमी खेळला आक्रमणाचा जोड देत चेन्नईला शानदार विजय साकारला. चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत मुंबई इंडियन्सच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं ( 42/2) दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.
धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. शेन वॉटसन ( 4) आणि मुरली विजय ( 1) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. रायुडू आणि डू प्लेसिसनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रायुडू 70 धावांवर असताना कृणाल पांड्यानं त्याचा झेल सोडला. पण, त्याच षटकात राहुल चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर रायुडूचा सुरेख झेल टिपला. रायुडू 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावांवर माघारी परतला.
फॅफने 42 धावांत अर्धशतक पूर्ण केले. दीड वर्षानंतर मैदानावर उतलेल्या धोनीला पहिल्याच चेंडूंवर पंचांनी बाद दिले. पण, DRSघेत धोनीनं पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज असताना फॅफनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. पुढच्या चेंडूवर चौकार खेचून फॅफनं चेन्नईला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला होता. एकीकडे मुंबईकर हुकमी वेगवान गोलंदाज मलिंगाच्या अनुपस्थित मैदानावर उतरणार होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून मलिंगाची ओळख आहे. दुसरीकडे, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी आधीच आयपीएलमधून माघार घेतली असल्याने, ते खेळणार नसल्याचे स्पष्ट होते. परंतु, स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू शकला नव्हता.