IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रजतने( Rajat Patidar) आतषबाजी केली.युवा फलंदाज रजतने लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना चोपून काढले. मोक्याच्या क्षणी लखनौच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला जीवदानही दिले. लखनौच्या गोलंदाजांनी आज दिशाहीन गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा उचण्यात रजत कुठेच चुकला नाही. नशिबाचीही RCB विशेषतः रजतला साथ मिळाली. दिनेश कार्तिकनेही अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करताना संघाला दोनशेपार धावसंख्या उभी करून दिली.
मोहसिन खानने पहिल्याच षटकात RCBला धक्का देताना कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला गोल्डन डकवर माघारी पाठवले. आयपीएल प्ले ऑफमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा फॅफ तिसरा कर्णधार ठरला. विराटने मिड ऑनला मारलेला चौकार पाहून BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीही ( Sourav Ganguly) भारी खूश झाला. विराटने या लढतीत ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचला मागे टाकन पाचवे स्थान पटकावले. कृणाल पांड्याने टाकलेल्या 6व्या षटकात रजत पाटीदारने 4,4,6,4 अशा 20 धावा चोपल्या. RCB ने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 52 धावा केल्या. त्याने विराटसह 33 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात रजतच्या 35 धावा होत्या. रजत तुफान फटकेबाजी करत होता, विराटने विकेट टिकवून खेळण्याचा प्रयत्न केला. 46 चेंडूंत 66 धावांची भागीदारी आवेश खानने संपुष्टात आणली. विराट 25 धावांवर बाद झाला.
रजतने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलला 9 धावांवर कृणाल पांड्याने माघारी पाठवले. 59 धावांवर रजतला जीवदान मिळाले. रजतने चौथ्या विकेटसाठी महिपाल लोम्रोरसह ( 14) 27 धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईच्या त्याच षटकात दिनेश कार्तिक अम्पायर कॉलमुळे वाचला. लोकेश राहुलने 15व्या षटकात कार्तिकचा झेल टाकला. आज नशीब RCBच्या बाजूने होतं, 16व्या षटकात दीपक हुडाकडून रजतचा झेल सुटला अन् चौकार मिळाला. बिश्नोईच्या त्या षटकात रजतने ( 6,4,6,4,6) 26 धावा चोपल्या. दिनेश कार्तिकनेही फटकेबाजीला सुरूवात केली. रजत व कार्तिकने 24 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 93 धावांवर पुन्हा रजतचा झेल सोडला. त्यानंतर त्याने षटकार मारून आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. 49 चेंडूंत त्याने ही शतकी खेळी केली.
रजत 54 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकांरांसह 112 धावांवर नाबाद राहिला. तर दिनेशने 23 चेंडूंत 37 धावा केल्या आरसीबीने 4 बाद 207 धावा केल्या.