Join us  

IND A vs NZ A: न्यूझीलंडविरूद्ध रजत पाटीदारने ठोकले शतक; ४ डावांमध्ये दुसऱ्यांदा केला असा पराक्रम 

सध्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 5:05 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या भारत अ आणि न्यूझीलंड अ (IND A vs NZ A) यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) याने शानदार फलंदाजी केली. पाटीदारने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी १३५ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १०९ धावांची शतकी खेळी केली. या मालिकेतील पाटीदारचे हे दुसरे शतक ठरले असून त्याने ४ डावात दोन शतके झळकावली आहेत. 

दरम्यान, न्यूझीलंड अ विरूद्ध मध्यप्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारचे शानदार प्रदर्शन राहिले आहे. त्याने न्यूझीलंडविरूद्ध ३ सामन्यांमधील ४ डावांमध्ये एकूण ३१९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकी खेळींचा समावेश आहे. त्याने मालिकेतील पहिल्याच सामन्यात १७६ धावांची शतकी खेळी केली होती. लक्षणीय बाब म्हणजे तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 

पाटीदारची शानदार फलंदाजी२०२२ च्या सुरूवातीपासूनच रजत पाटीदार शानदार लयनुसार खेळत आहे. रजतने यावर्षीच रणजी ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात १२२ धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत पाटीदारने ६ सामने खेळले आहेत, ज्यातील ९ डावात त्याने एकूण ६५८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या १३ डावांमध्ये ८८.८२ च्या सरासरीने ९७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान रजतने ४ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. रणजी ट्रॉफीच्या २०२२ च्या हंगामात पाटीदार हा सरफराज खान (९८२) नंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. 

कसोटीतून भारतीय संघात करणार पदार्पण? रजत पाटीदारचा शानदार फॉर्म पाहता तो भारतासाठी कसोटी पदार्पण करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रजतचा भारतीय संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तो भारतीय संघातील रहाणेचे स्थान पूर्ण करू शकतो. रजत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघअजिंक्य रहाणेबीसीसीआय
Open in App