jay shah icc chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. १६ पैकी १५ सदस्यांचा जय शाह यांना पाठिंबा असल्याने ते आयसीसीचे नवे अध्यक्ष असतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. पण, ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागते याबद्दल क्रिकेट वर्तुळात उत्सुकता आहे. खरे तर शाह यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी ९६ तासांपेक्षा कमी वेळ आहे, कारण अधिकृत नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्ट ही आहे. आयसीसीचे नवे अध्यक्ष १ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारतील. (jay shah bcci secretary)
...तर BCCI सचिव कोण होणार?राजीव शुक्ला - जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयच्या सचिवपदी राजीव शुक्ला यांची निवड होऊ शकते. ते सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेले शुक्ला यांना ही जबाबदारी मिळते का हे पाहण्याजोगे असेल. आशिष शेलार - महाराष्ट्रातील भाजपचा एक मोठा चेहरा म्हणून आशिष शेलार यांच्याकडे पाहिले जाते. ते बीसीसीआयचे खजिनदार असून, मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रशासनात त्यांचा वावर असतो. शेलार राजकारणात खूप सक्रिय असल्याने बीसीसीआयचे सचिवपद हे वेळखाऊ काम ते स्वीकारतील का याचीही क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. अरुण धुमाळ - जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचे अध्यक्ष असलेल्या अरुण धुमाळ यांना बोर्ड चालवण्याचा आवश्यक अनुभव आहे. ते खजिनदार राहिले आहेत. धुमाळ आणि शुक्ला हे पदांची अदलाबदल करू शकतात. परंतु, अनेकदा बीसीसीआय कोणालाही कल्पना नसलेल्या नावांची घोषणा करत असते.
दरम्यान, राजीव शुक्ला, आशिष शेलार आणि अरुण धुमाळ यांच्याशिवाय इतरही काही नावांची दबक्या आवाजात चर्चा आहे. रोहन जेटली, अविशेक दालमिया, दिलशेर खन्ना, विपुल फडके आणि प्रभातेज भाटिया या तरुण नावांचाही विचार केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या एका माजी सचिवाने सांगितले की, बीसीसीआयच्या धोरणानुसार पूर्णपणे नवीन चेहऱ्याला हे सर्वोच्च पद मिळण्याची शक्यता फार कमी आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार ही प्रमुख पदे आहेत. कोणीतरी नवीन येऊ शकते, परंतु ती शक्यता कमी आहे. त्याआधी जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत का हे महत्त्वाचे आहे. जरी आता नसले तरी ते आगामी काळातही या पदासाठी निवडले जाऊ शकतात.