Join us  

विराट कोहलीचा फोन switched off येतोय, प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांची माहिती; सौरव गांगुलीच्या विधानावर व्यक्त केलं आश्चर्य

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचे कोच राजकुमार शर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष  सौरव गांगुली यांच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 4:19 PM

Open in App

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचे कोच राजकुमार शर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष  सौरव गांगुली यांच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची वन डे फॉरमॅटमधील विजयाची टक्केवारी ही सर्वाधिक ७० टक्के इतकी आहे. तरीही त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवणं राजकुमार शर्मा यांना ( Rajkumar Sharma ) यांना फार रुचलेलं नाही. बीसीसीआय आणि निवड समितीनं रोहित शर्माला वन डे संघाचा नवा कर्णधार म्हणून जाहीर केल्यानं राजकुमार यांना धक्का बसला आहे. विराट आता फक्त कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर रोहितकडे वन डे व ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ९५ वन डे सामन्यांत ६५ विजय मिळवले आहेत, तर २७ पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून ७२.६५च्या सरासरीनं ५४४९ धावाही केल्या आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जेव्हा विराटनं ट्वेंटी-२० संघाचं नेतृत्व सोडलं तेव्हाच बीसीसीआय व निवड समितीनं त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी होती, असे राजकुमार शर्मा यांनी मत व्यक्त केले. वन डे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराटशी बोलणं झालं नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले,''मी विराट कोहलीशी अजून यासंदर्भात बोललेलो नाही. काही कारणास्तव त्याचा फोन स्वीच ऑफ येतोय. तो या निर्णयानंतर नक्कीच खूप दुखावला आहे. माझ्या माहितीनुसार त्यानं केवळ ट्वेंटी-२०संघाचे नेतृत्व सोडले आहे आणि त्याचवेळी निवड समितीनं त्याला मर्यादित षटकांच्या  संघाचे कर्णधारपद सोडायला सांगायला हवं होतं किंवा राजीनामा देऊ नको असं सांगायला हवं होतं.''

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानावरही तो नाखुश आहे. कोहलीचे प्रशिक्षक म्हणाले,''सौरव गांगुलीनं दिलेलं विधान मी नुकतंच वाचलं आणि त्यात ते म्हणाले की त्यांनी कोहलीला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस असे सांगितले होते. मला असं काही आठवत नाही. त्यांच्या या विधानानं मला आश्चर्याचा धक्का बसला.'' 

५६ वर्षीय शर्मा यांनी निवड समितीवरही टीका केली. ''या निर्णयामागचं नेमकं कारण निवड समितीही देऊ शकलेली नाही. संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय किंवा निवड समितीला नेमकं काय हवंय, याची आम्हाला कल्पना नाही. त्यांच्या निर्णयामागे कोणतंही स्पष्टीकरण किंवा पारदर्शकता नाही. जे घडले ते खेदजनक आहे. तो वन डे संघाचा यशस्वी कर्णधार आहे,''असेही ते म्हणाले. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयसौरभ गांगुली
Open in App