शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ‘त्या’ चुकीमुळे राजवर्धनची कारकीर्द धोक्यात; वयाच्या वादाला नवे वळण

१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील युवा अष्टपैलू क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याच्या वयावरून निर्माण झालेल्या वादाला वेगळे वळण लाभले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:56 AM2022-03-04T08:56:35+5:302022-03-04T08:58:00+5:30

whatsapp join usJoin us
rajvardhan hangargekar career in jeopardy due to big mistake of school principal new twist to the age dispute | शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ‘त्या’ चुकीमुळे राजवर्धनची कारकीर्द धोक्यात; वयाच्या वादाला नवे वळण

शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ‘त्या’ चुकीमुळे राजवर्धनची कारकीर्द धोक्यात; वयाच्या वादाला नवे वळण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेतन धानुरे, लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील युवा अष्टपैलू क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याच्या वयावरून निर्माण झालेल्या वादाला वेगळे वळण लाभले आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या तत्कालीन मुख्याध्यापकांचा मृत्यू झाल्यामुळे नेमकी कारवाई कोणावर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारताच्या १९ वर्षांखालील संघात वर्णी लागल्यानंतर उस्मानाबादचा अष्टपैलू क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकरने आशिया आणि विश्वचषकात आपल्या चमकदार कामगिरीने छाप सोडली होती. यामुळेच यंदाच्या आयपीएल लिलावात चेन्नई संघाने त्याला दीड कोटी रुपये मोजून संघात घेतले. 

दरम्यान, या यशाची धूळ खाली बसते न बसते तोच त्याच्यावर वयचोरीचे आरोप करण्यात आले होते. क्रीडा आयुक्तांनी राजवर्धनच्या जन्मतारखेची चौकशी करून त्याचा अहवाल देण्यास जिल्हा परिषदेला सूचित केले होते. त्यानुसार शिक्षण विभागाच्या समितीने चौकशी केल्यानंतर शाळेच्या नोंदीत खाडाखोड असल्याचे स्पष्ट झाले. मात्र यास तत्कालीन मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे निरीक्षण या चौकशी समितीने नोंदविले आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्याध्यापक शरदकुमार यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे नेमकी कारवाई कोणावर होणार, याचा पेच अधिकाऱ्यांसमोर आहे.

नेमके काय घडले?

- राजवर्धन हा दहावीपर्यंत उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. सुरुवातीला त्याची जन्मतारीख १० जानेवारी २००१ अशी नोंदवली गेली. दरम्यान, ही चूक लक्षात आल्यानंतर त्याचे वडील सुहास हंगरगेकर यांनी राजवर्धनच्या खऱ्या जन्मतारखेचा दाखला उस्मानाबाद पालिकेकडून ७ जुलै २०१६ रोजी मिळविला तेव्हा त्यात १० नोव्हेंबर २००२ अशी नोंद मिळून आली. त्यांनी हा दाखला जोडून वय दुरुस्तीचा प्रस्ताव तत्कालीन मुख्याध्यापक शरदकुमार यांच्याकडे दाखल केला. त्याआधारे मुख्याध्यापकांनी जनरल रजिस्टरला नव्या जन्मतारखेची नोंद घेतली.

तक्रारीचे काय होणार?

राज्याचे क्रीडा आयुक्त यांनी शिक्षण विभागाकडे दिलेल्या अहवालानुसार  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांना राजवर्धनच्या जन्मतारखेबाबत कळविले आहे. मात्र, जन्मतारीख बदलाची प्रक्रिया ही मुख्याध्यापकस्तरावरून चुकलेली असल्याने यास दोन्ही मंडळे राजवर्धनला कसे दोषी धरणार? कारण जन्मतारीख बदलाचा प्रस्ताव देणारे वडील सुहास हंगरगेकर व शिक्षण विभागास प्रस्ताव सादर न करणारे मुख्याध्यापक शरदकुमार या दोघांचाही मृत्यू झाल्याने कार्यवाही नेमकी कोणावर होणार, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

राजवर्धन हंगरगेकर. विश्व विजेत्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज. त्याच्या वयावरुन वाद सुरू होताच लोकमतने याबाबत सखोल चौकशी केली. त्यातून निष्पन्न झालेल्या गोष्टी वाचकांपुढे ठेवत आहोत...

कुठे आणि कोण चुकले..?

- जन्मतारखेत बदल करावयाचा असल्यास इयत्ता दहावीपूर्वी तो करता येतो. यासाठी जन्मदाखला हा सबळ पुरावा मानण्यात येतो. या जन्मदाखल्यासह पालकांनी रितसर प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करणे गरजेचे असते. 

- त्यानंतर मुख्याध्यापकांनी हा प्रस्ताव त्यांच्या अभिप्रायासह शिक्षण विभागाकडे सादर करणे क्रमप्राप्त. शिक्षण विभागाने मंजुरी दिल्यास नवीन जन्मतारखेची नोंद घेता येते. 

- राजवर्धनच्या प्रकरणात तत्कालीन मुख्याध्यापक शरदकुमार यांनी असा प्रस्ताव शिक्षण विभागास सादर न करता परस्पर नोंद घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरले गेले आहे.

राजवर्धनच्या जन्मतारखेबाबत उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेला चौकशी अहवाल आपण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाठविला आहे. यावर काय निर्णय घ्यायचा तो अधिकार त्यांचा आहे. - ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त

राजवर्धनच्या दाखल्यावरील जन्मतारखेत बदल मुख्याध्यापक स्तरावरून करण्यात आला होता. जो अधिकार शिक्षणाधिकारी यांचा आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रथमदर्शनी संबंधित मुख्याध्याक दोषी दिसतात. तसा अहवाल दिला आहे. -राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद उस्मानाबाद.
 

Web Title: rajvardhan hangargekar career in jeopardy due to big mistake of school principal new twist to the age dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.