देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांसह नामांकित मंडळी याची झलक शेअर करत आहेत. भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. १८ ऑगस्ट २०२४ रोजी किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची १६ वर्षे पूर्ण केली. अलीकडेच विराटने ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या विजयानंतर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. आयपीएलमधील विराटची फ्रँचायझी असलेल्या आरसीबीने रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना एक लक्षवेधी पोस्ट केली. विराट कोहली आणि भारतीय महिला संघाची खेळाडू श्रेयांका पाटील यांचा फोटो शेअर करत त्यांनी भारी कॅप्शन लिहिले.
विराट आता केवळ वन डे, कसोटी आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. आरसीबीने विराट आणि श्रेयांका यांचा फोटो शेअर करत म्हटले की, जसे आमचे सुपरस्टार त्यांच्या बॅटचे रक्षण करतात तसे तुमच्या बहिणींचे रक्षण करा. विराट पावसात बॅट भिजू नये म्हणून तिची काळजी घेताना दिसत आहे. तर श्रेयांकाने बॅटला मिठी मारल्याचे दिसते.
१८ ऑगस्ट २००८ साली विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. विराटने अलीकडेच स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत विविध बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी त्याने रॅपिड फायरमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे देताना मुंबईला आपले घर असे संबोधले. आवडता क्रिकेटर या प्रश्नावर विराटने महेंद्रसिंग धोनी आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांच्या नावाला पसंती दिली. चिन्नस्वामी स्टेडियम आवडते असल्याचेही त्याने सांगितले. तसेच आयपीएलमधील आवडता प्रतिस्पर्धी संघ म्हणून त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचे नाव घेतले. याशिवाय मुंबई शहराला किंग कोहलीने घर असे संबोधले. आवडता गायक अरिजीत सिंह तर आवडता सण म्हणून विराटने दिवाळी सणाला प्राधान्य दिले.