राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आता उलटी गिनती सुरू झाली असून सोमवारी हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमासाठी खेळाडूंना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एक पोस्ट केली, ज्यातून रामललाच्या आगमनाची आतुरता स्पष्ट होते.
राम मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व्यतिरिक्त या यादीत रवींद्र जडेजाच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याही नावाचा समावेश आहे.
वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "कदाचित हा पहिला सोमवार असावा, ज्याची रविवारी एवढ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. श्री राम जय राम जय जय राम."
विविध खेळातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पीटी उषा, अनिल कुंबळे, कपिल देव, लिएंडर पेस, महेंद्रसिंग धोनी, मिताली राज, हरमनप्रीत कौर, नीरज चोप्रा, पुलेला गोपीचंद, पीव्ही सिंधू, राहुल द्रविड, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, विश्वनाथन आनंद, कर्णम मल्लेश्वरी, कल्याण चौबे, देवेंदा झांजाडाले, बायचुंग भुतिया, बचेंद्री पाल, प्रकाश पादुकोण यांचा समावेश आहे.