ram mandir ayodhya news | अयोध्या: मागील काही दशकं देशाचं राजकारण ज्या वास्तूभोवती पाशी फिरत आहे, ती वास्तू म्हणजे अयोध्येतील राम मंदीर. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या भव्य कार्यक्रमासाठी आमंत्रित पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि इतर अनेक भाषांमधील तज्ञांची टीम तैनात केली आहे. मंगळवारपासून अतिथी मंडळींशी बोलण्याचा क्रम सुरू झाला आहे. सर्वांनी २० जानेवारीला दिवसा किंवा २१ जानेवारीच्या सकाळपर्यंत अयोध्येत पोहोचावे अशी विनंती करण्यात आली. याशिवाय या महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व अतिथींचा प्रवासाचा तपशील मागवला जात आहे.
दरम्यान, अतिथींना ईमेल किंवा व्हॉट्सॲपवरद्वारे देखील संदेश दिला जात आहे. या आधारे त्यांची निवास व भोजन व्यवस्था केली जाईल. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या सर्वांना सकाळी १० वाजता रामजन्मभूमी संकुलात पोहोचावे लागेल. राम मंदीर ट्रस्टने उत्तर भारतीय अतिथींशी संवाद साधण्यासाठी जवळपास सात ते आठ हिंदी भाषिक तज्ज्ञ तैनात केले आहेत. देशाच्या ईशान्य आणि दक्षिण भागातून आमंत्रित अतिथींशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषा तज्ज्ञ देखील असणार आहेत.
अतिथींशी बोलण्यासाठी विविध भाषांचे तज्ज्ञकाही तज्ज्ञांवर ३०० तर काहींवर ५०० अतिथींशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिथींमध्ये देशातील नामांकित संत, महंत, खेळाडू, सिनेसृष्टीतील कलाकार, शास्त्रज्ञ, लेखक, कवी, इतर कलाकार यांचा समावेश आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात जन्मभूमी संकुलात आठ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येईल.
एक कोटी रूपयांचे दान करणारेही विशेष अतिथी लक्षणीय बाब म्हणजे अतिथींना फोन केल्यानंतर तज्ज्ञ त्यांच्याशी 'जय श्री राम'ने संभाषण सुरू करू शकतात. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांची माहिती त्यांना दिली जाईल. आतापर्यंत केवळ ३० टक्के अतिथींशी फोनवरून संभाषण साधता आले आहे. हा क्रम पुढील दोन ते तीन दिवस सुरू राहील. मंदिराच्या निर्माणासाठी एक कोटी रूपयांचे दान करणाऱ्या मंडळीला देखील विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना फोनद्वारे आमंत्रणाचा संदेश देण्यात आला. त्यांच्या खाण्यापिण्याची तसेच राहण्याची सोय मंदीर ट्रस्ट करणार आहे.