संजू सॅमसनचे पहिले एकदिवसीय शतक, तिलक वर्माचे अर्धशतक आणि अर्शदीप सिंगचे चार बळी व अन्य गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवताना ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. भारताने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. संजू सॅमसन सामनावीर तर अर्शदीप सिंग मालिकावीर ठरला.
भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे केएल राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवादाची. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज फलंदाजीसाठी आला तेव्हा पारलच्या मैदानात 'राम सिया राम' हे गाणं वाजवण्यात आलं. फलंदाजी असो की गोलंदाजी, महाराज जेव्हा जेव्हा ऍक्शनमध्ये असतो तेव्हा हे गाणे वाजवल्याचं पाहायला मिळाले.
केशव महाराजने फलंदाजीसाठी येताच त्याच्यात आणि भारताचा यष्टिरक्षक आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात एक मजेदार संवाद झाला. दोघांमधील आता हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केएल राहुल हसत हसत म्हणाला महाराज, तु जेव्हाही मैदानात येतो तेव्हा डीजेवर 'राम सिया राम' हे गाणं वाजवलं जातं. यावर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर म्हणजेच महाराज राहुलच्या बोलण्याला सहमती देत हो असं उत्तर देतो. यानंतर दोघंही हसायला लागतात.
या दोन्ही क्रिकेटपटूंच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधीही केशव महाराज अनेक प्रसंगी भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले. तो हनुमानाचा भक्त आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर महाराजांनी सोशल मीडियावर एक खास संदेश शेअर केला होता. 'मी देवावर विश्वास ठेवतो. माझ्या संघाने किती चमकदार क्रिकेट खेळले आणि एक विशेष निकाल लागला. जय श्री हनुमान', असं केशव महाराजने म्हटलं होतं.