मुंबई - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरू आणि देशासह जगाला दिग्गज क्रिकेटर देणारे क्रिकेटचे भीष्म पितामह रमाकांत आचरेकर सरांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यानंतर, आचरेकर सरांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तत्पूर्वी आचरेकर सरांच्या घरी जाऊन त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दिग्गजांनी गर्दी केली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसह अनेक दिग्गज क्रिकेटर, आचरेकर सरांचे शेकडो शिष्य, क्रिकेट विश्वातील मान्यवर आणि स्थानिक नेते आचरेकर सरांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हेही आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनसाठी त्यांची घरी आले. थोड्याच वेळाच आचकरेकर सरांना अखेरचा निरोप देण्यात येईल. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीला आजपासून सिडनीत सुरुवात झाली आहे. या सामन्याला सुरुवात होताच, भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले होते. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.