कराची : आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तान क्रिकेटने आपल्या खेळाडूंच्या वेतनात २५० टक्के वाढ केली. याचा सर्वात मोठा लाभ ‘ड’ गटात मोडणाऱ्या खेळाडूंना होणार आहे. या खेळाडूंचे मासिक वेतन ४० हजार रुपये(भारतीय रुपयांत १७ हजार) होते. त्यांच्या वेतनात एक लाखाने वाढ होईल.
पीसीबीचे नवे प्रमुख रमीझ राजा यांनी सूत्रे स्वीकारताच पहिली मोठी घोषणा केली. स्थानिक खेळाडूंच्या वेतनात एक लाखाची वाढ केली असून त्याचा लाभ १९२ स्थानिक खेळाडूंना होईल. याशिवाय प्रथमश्रेणी आणि ग्रेडस्तर स्पर्धेतील खेळाडूंना महिन्याला १.४ लाखावरून २.५ लाख इतकी कमाई होईल. अ श्रेणी खेळाडूंना १३.७३ लाखांऐवजी १४.७५ लाख, ब श्रेणी खेळाडूंना ९.३७ लाखांऐवजी १०.३७ लाख तसेच क श्रेणी खेळाडूृंना ६.८७ लाखांऐवजी ७.८७ लाख रुपये मिळतील. रमीझ यांनी खेळाडूंना संघात स्थान मिळणार की नाही याची चिंता न बाळगता मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय अस्मितेसाठी खेळा, असे ते म्हणाले.
विश्वचषकात समीकरण बदलेल
टी-२० विश्वचषकात २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्याबाबत विचारताच रमीझ म्हणाले,‘मी खेळाडूंसोबत बोललो. त्यांना विश्वचषकातील भारताविरुद्ध पराभवाची शृंखला मोडित काढण्याचे आवाहन केले. भारताविरुद्ध शंभर टक्के योगदान देत निकाल फिरविण्याचा विचार नक्की होईल. यंदा पाकिस्तान बाजी मारेल, असा मला विश्वास वाटतो. भारताविरुद्ध सध्या तरी द्विपक्षीय मालिका खेळणे शक्य नाही. राजकारणाचा खेळावर फारच विपरीत परिणाम जाणवत आहे. या प्रकरणी आम्ही कुठलीही घाई करणार नाही.’