क्रिकेटचा आशिया चषक श्रीलंकेतच व्हावा : पीसीबी
कराची : श्रीलंकेत सुरू असलेल्या अराजकतेनंतरही २७ ऑगस्टपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन याच देशात व्हायला हवे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी व्यक्त केले. लंकेत नागरिकांमध्ये असंतोष असताना यजमान देशाने ऑस्ट्रेलियाचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषविले होते, असे पीसीबीने म्हटले आहे.
पाकिस्तान संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, उभय देशांमध्ये शनिवारपासून पहिली कसोटी खेळली जाईल. पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी श्रीलंका क्रिकेटच्या (एसएलसी) अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यादरम्यान २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया चषकाच्या आयोजनास आपला पाठिंबा असल्याचे सांगून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, शिवाय आर्थिक लाभही होऊ शकेल, असा विश्वास रमीझ यांनी व्यक्त केला.
लंकेत लोकांच्या भावना तीव्र असल्या तरी पाकिस्तान संघ कोलंबो आणि गाले कसोटी खेळणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची आता कुठलीही बैठक होणार नाही. २२ ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत एसीसीचे सर्वच सदस्य उपस्थित राहतील. यावेळी आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानकडे सोपविण्याचा मुद्दा चर्चेला येणार आहे.
आयपीएलला विरोध करणारआयसीसी बैठकीत रमीझ राजा हे आयपीएलच्या दीर्घकालीन वेळापत्रकाला विरोध दर्शविणार आहेत. २०२३ पासून सुरू होत असलेल्या भविष्यकालीन दौरा वेळापत्रकात (एफटीपी) बीसीसीआयकडून आयपीएलसाठी अडीच महिन्यांचा कालावधी मागण्यावर पीसीबी नाराज आहे. रमीझ हे अडीच महिन्यांच्या कालावधीला कडाडून विरोध करण्याच्या मूडमध्ये आहेत.
२००८च्या मुंबई बॉम्ब हल्ल्यापासून आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. याशिवाय द्विपक्षीय मालिकाही बंद आहेत. हे लक्षात घेता विस्तारित आयपीएल विंडोमुळे पाकला कुठलाही लाभ होणार नाही. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या वेतनातील दहा टक्के वाटा संबंधित बोर्डाना जातो. अन्य बोर्डांना लाभ होत असताना पीसीबीला काहीही मिळत नाही. आयपीएलच्या कालावधीमुळे अन्य देशांच्या नियमित वेळापत्रकावर विपरीत परिणाम होत असल्याचा पीसीबीचा आरोप आहे.