Ramiz Raja vs Pakistan: माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांना काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. रमीझ राजा यांच्या जागी माजी पत्रकार नजम सेठी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला. PCBच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर रमीझ राजा यांनी अनेक विषयांवर मौन सोडत थेट पाकिस्तानचीच लाज काढली. तसेच, हा संपूर्ण मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर मांडणार असल्याचेही राजा यांनी सांगितले.
असं फक्त पाकिस्तानाच होऊ शकतं...
रमीझ राजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, "हे फक्त पाकिस्तानमध्येच होऊ शकते की तुम्ही नियमांचे उल्लंघन करून एखाद्याला मुदत संपण्यापूर्वी काढून टाकत आहात. हा मुद्दा मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडणार आहे. हा निव्वळ राजकीय हस्तक्षेप आहे. टर्मच्या मध्यभागी तुम्ही एखाद्याला बाजूला होण्यास कसे काय सांगता. असे लोक मागच्या दाराने आले तर काय होईल? यामुळे बाबर आझम आणि संपूर्ण टीमवर दबाव निर्माण झाला आहे, कारण त्यांना नवीन लोकांसोबत काम करावे लागणार आहे."
संघावर दडपण वाढणार...
"तुम्ही इंग्लंडकडून मालिका घरच्या मैदानात हरलात. त्यातच हंगामाच्या मध्येच तुम्ही व्यवस्थापन बदलत आहात. एखाद्याला नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून घेण्यासाठी तुम्ही संविधान बदलता हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकते. जगात कुठेही असे घडताना मी पाहिलेले नाही. मी खूप कॉमेंट्री केली आहे, मी MCC चा सदस्य आहे. आता मी ऑक्सफर्डमध्येही व्याख्यान देणार आहे, जिथे मी हा मुद्दा नक्कीच मांडणार आहे," असे रमीझ राजा रोखठोक म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष पदावरून रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा मायदेशात दारूण पराभव झाला. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या संघाला 0-3 ने कसोटी मालिका गमवावी लागली. घरच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्णय घेतला असून रमीझ राजा यांची पीसीबी अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. रमीझ राजा यांनी बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादावर दिवसेंदिवस वेगवेगळी विधानं करून सर्वांचे लक्ष वेधले होते.