नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान आणि भारत या संघांना सुपर-4 च्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 1 बळी राखून निसटता विजय मिळवला. मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा सामना वादामुळे खूपच चर्चेत राहिला. सामना झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या संतप्त चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यावरूनच आता पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, या वादावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच अफगाणिस्तानविरूद्ध आयसीसीला पत्रव्यवहार करून न्याय मागणार असल्याचे राजा यांनी सांगितले. लाईव्ह सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली बाद होताच सामन्याला गालबोट लागले होते. कारण अफगाणिस्तानच्या फरीद अहमदने आसिफ अलीचा बळी घेतल्यावर पाकिस्तानी खेळाडूचा ताबा सुटला आणि त्याने मारण्यासाठी बॅट उचलली. बाद झाल्यानंतर आसिफ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र पंच आणि खेळाडूंनी केलेल्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र सामना झाल्यानंतर एका नव्या प्रकरणामुळे वाद चिघळला आहे.
रमीझ राजा यांची आक्रमक भूमिका पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, "अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर झालेली घटना अत्यंत चुकीची असून आम्ही याबाबत आयसीसीला पत्र पाठवणार आहोत. तसेच आमच्याकडून जे शक्य असेल ते सर्वकाही करू. हे असे पहिल्यांदाच झाले नाही यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. काल पाकिस्तानचा संघ अडचणीत येण्याची शक्यता होती", अशा शब्दांत रमीझ राजा यांनी अफगाणिस्तानी चाहत्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. याचा व्हिडीओ पीसीबीच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रिकपाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर-4 मध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. हॉंगकॉंगला मोठ्या अंतराने पराभूत करून पाकिस्तानने सुपर-4 मध्ये जागा मिळवली होती. बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. अखेर 20 षटकांमध्ये 6 बाद 129 एवढी धावसंख्या करून अफगाणिस्तानने 130 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करून पाकिस्तानला घाम फोडला. मात्र अखेरच्या षटकात पाकिस्तानने निसटता विजय मिळवून विजयाची हॅट्रिक लगावली. पाकिस्तानने 19.2 षटकात 9 बाद 131 धावा करून सामना आपल्या नावावर केला.