पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) नेहमी BCCIशी स्पर्धा करत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) यशानंतर PCBने त्यांची स्वतःची पाकिस्तान सुपर लीग ( PSL) सुरू केली. २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने शेजारील राष्ट्र पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले आणि पाकिस्तानी खेळाडूंवर IPL बंदी घातली गेली. त्यामुळे PSL च्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड IPLशी स्पर्धा करताना दिसतेय. रमीझ राजा ( Ramiz Raja) हे PCBचे अध्यक्ष झाल्यापासून ही स्पर्धा आणखी वाढली. आता तर रमीझ राजा यांनी थेट IPL ला आव्हान दिले आहे. IPLच्या धर्तीवर आता PSLमध्येही ऑक्शन सुरू करण्याचा निर्धार बोलून दाखवताना रमीझ राजा यांनी मग बघूया PSL सोडून IPL कोण खेळतं, असं ओपन चॅलेंज दिलं.
''आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी आम्हाला नवीन सोर्स तयार करायला हवा. आता आमच्याकडे PSL आणि ICC कडून येणारा निधी हे दोनच आर्थिक सोर्स आहेत. पुढील वर्षी पीएसएलच्या रचनेत बदल करण्याची चर्चा सुरू आहे. मला पुढील वर्षी पीएसएलमध्ये ऑक्शन पद्धत आणायची आहे. मार्केट यासाठी अनुकूल आहे, परंतु फ्रँचायझी मालकांसोबत याबाबत चर्चा करायला हवी,''असे रमीझ राजा म्हणाले.
पीएसएलमध्ये ऑक्शन सुरू केल्यानंतर अनेक प्रायोजन आकर्षित होतील आणि पीएसएलला मोठा आर्थिक फायदा होईल, असा विश्वास राजा यांना आहे. ते म्हणाले,''हा पैशांचा खेळ आहे. पाकिस्तानची क्रिकेट अर्थव्यवस्था वाढली, तर आमचा आदरही वाढेल. सध्यातरी त्यासाठी PSLहाच एक सोर्स आमच्याकडे आहे. जर आम्ही PSLमध्ये ऑक्शन सुरू केले आणि फ्रँचायझींच्या पर्स मर्यादा वाढवली, तर आम्ही IPLला टक्कर देऊ शकतो. मग बघतो की PSL सोडून कोण IPL खेळायला जातं.''
''प्रत्येक फ्रँचायझीच्या बटव्यातील रक्कम वाढवली जाईल आणि त्यांना सुधारणा हवी असेल, तर त्यांना पैसा खर्च करावाच लागेल. तेव्हा जगातील अनेक स्टार्स तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. मी काही फ्रँचायझी मालकांशी याबाबत चर्चा केली आहे, तेही हा प्रयोग करण्यात उत्साही आहेत,''असेही राजा यांनी स्पष्ट केले.