भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये २४ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये माहामुकाबला होणार आहे. पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू त्यांचा संघ कसा तगडा आहे आणि त्यांच्यासमोर विराट कोहली अँड कंपनी कशी दुबळी आहे, हेच सांगत सुटले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहास सर्वांना माहित आहे आणि पाकिस्तानला एकदाही टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही. तरीही त्यांच्याकडून यंदा उलटफेर होईल असा दावा केला जात आहे. भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे फक्त क्रिकेट चाहत्यांच्याच नव्हे, तर क्रिकेटेतर प्रेक्षकांचाही चर्चेचा विषय. सामान्यपासून ते सेलिब्रेटींपर्यंत याची चर्चा. अशाच एका मोठ्या उद्योगपतीनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाला ( PCB) या सामन्यावरून मोठी ऑफर दिली आहे. PCBचे नवीन अध्यक्ष रमीज राजा ( PCB chairman Ramiz Raja ) यांनी ही माहिती दिली.
पाकिस्तानातील एका बड्या उद्योगपतीनं बँक चेक देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याची अट फक्त एकच आहे की पाकिस्ताननं २४ ऑक्टोबरला टीम इंडियाला पराभूत करावं, अशी माहिती राजा यांनी दिली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारत-पाक यांच्यात पाच सामने झाले आणि ते सर्व टीम इंडियानं जिंकले. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज येथे दिलेल्या भेटीदरम्यान राजा बोलत होते.
यावेळी त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. ''पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा गाढा हा आयसीसीकडून मिळणाऱ्या ५० टक्के निधीतून चालतो आणि आयसीसीचा ९० टक्के निधी हा भारतातून येतो. जर भारतानं आयसीसीला निधी देण्यास नकार दिल्यास, PCB कोसळून जाण्याची भीती आहे आणि कारण PCBकडून आयसीसीला शून्य टक्के निधी मिळतो, हे सत्य आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला बळकट करण्याचा माझा प्रयत्न असेल,''असे ते म्हणाले.
भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं तासाभरात विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं तासाभरात विकली गेली आहेत. २४ ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील, अशी शक्यता होती. पण, आयसीसीनं स्टेडियमच्या ७० टक्के प्रेक्षकक्षमतेला परवानगी दिली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ही २५,००० इतकी आहे आणि १८,५०० तिकिटं उपलब्ध होती.
क्रिकेट पाकिस्तान यांनी दिलेल्या वृत्तानुसार ३ ऑक्टोबरला तिकिटांच्या विक्रीला सुरूवात झाली आणि तासाभरात ती विकली गेली. जनरल, जनरल ईस्ट, प्रीमियम, पेव्हेलियन ईस्ट आणि प्लॅटिनम स्टँड्समध्ये बसून प्रेक्षकांना हा सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. आयसीसीनं तिकीट विक्रिला सुरुवात झाल्याची घोषणा करताच फॅन्स तुटून पडले. प्रीमियम तिकिट जवळपास ३० हजाराला विकलं गेलं, तर प्लॅटिनम तिकिट ५२,५०० ला विकलं गेलं आहे.
पाकिस्तानचा संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर