नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून ते पीसीबीवर विविध माध्यमातून टीका करत आहेत. दररोज ते मोठे खुलासे करून सर्वांचे लक्ष वेधत आहेत. आता रमीझ राजा यांनी म्हटले आहे की, पीसीबीमध्ये असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या आणि तेव्हापासून ते बुलेट प्रूफ कार वापरत होते.
पाकिस्तान सरकारने राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवले आणि त्यांच्या जागी नजम सेठी यांची नियुक्ती केली. सेठी यांनी पदभार स्वीकारताच अनेक बदल केले, त्यापैकी एक म्हणजे मोहम्मद वसीम यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती हटवणे आणि शाहिद आफ्रिदीच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय निवड समिती स्थापन करणे. शाहिद आफ्रिदी निवड समितीचा अध्यक्ष होताच संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदला संघात स्थान मिळाले.
सुरक्षेसाठी खरेदी केली 1.65 कोटींची कार
रमीझ राजा पीसीबीचे अध्यक्ष असताना त्यांनी 1.65 कोटींची कार खरेदी केली होती. या प्रकरणी त्यांना विचारले असता पाकिस्तानातील वृत्तवाहिनी समा टीव्हीशी बोलताना ते म्हणाले, "ती गाडी पीसीबीकडे आहे. मी ती खरेदी केली नाही. माझ्यानंतर जे आले आहेत ते देखील याचा वापर करू शकतात. मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याशिवाय तुम्ही बुलेट प्रूफ कार खरेदी करू शकत नाही. म्हणूनच मी ही कार घेतली होती."
"मी याबद्दल अधिक माहिती शेअर करू शकत नाही. पण हा प्रकार मार्च 2022 मध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान घडला. डीआयजी साहेब माझ्या घरी आले होते आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून मी ही खबरदारी घेतली होती. असे रमीझ राजा यांनी सांगितले.
पीसीबीने देखील दिली धमकी
पीसीबीतून हकालपट्टी झाल्यानंतर रमीझ राजा सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. दरम्यान, त्यांनी पीसीबीबाबत अनेक खुलासे करत बोर्डावर निशाणा साधला. बोर्डाच्या कार्यालयातून सामान उचलण्यासही मज्जाव केला जात होता असे राजा यांनी सांगितले होते. यानंतर पीसीबीने रमीझ राजा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ramiz Raja revealed that he was threatened to kill me when the Australian team came to Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.