Join us  

अरे, हा डोक्यावर पडलाय काय? रमीझ राजाने PCB अध्यक्ष नजम सेठी यांना सुनावले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी एक अनोखी कल्पना सूचवली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 4:31 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी एक अनोखी कल्पना सूचवली आहे. ही स्पर्धा आशियाई देशांबाहेर व्हावी आणि भारत-पाकिस्तान यांच्यातले सामने इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवण्यात यावे, असे सेठी यांचे म्हणणे आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी ही कल्पना फेटाळून लावली आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष राजा यांनी आशिया चषक युरोपियन भूमीवर खेळण्याच्या कल्पनेला विरोध केला आणि सेठींच्या मानसिक स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राजकारण आणत नाही! शाहिद आफ्रिदी ODI WC बाबत स्पष्टच म्हणाला

"लॉर्ड्सवर आशिया चषक खेळताना पाहून खूप आनंद होईल असे पीसीबी अध्यक्षांचे म्हणणे ऐकून मला धक्का बसला. तो मानसिकदृष्ट्या स्थिर आहे की नाही?", राजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले. "वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आशिया चषकाचा संपूर्ण मुद्दा हा होता की संघांना उपखंडातील परिस्थितीशी जुळवून घेता येईल," असे ते पुढे म्हणाले. पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा पुढचा सीझन UAE मध्ये खेळवण्याच्या सूचनेबद्दल राजा यांनी सेठींना फटकारले. त्यांनी विचारले की, तुम्हाला पीएसएल पाकिस्तानमध्ये नको असताना तुम्ही अन्य संघांना पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास कसे सांगू शकता?

"मला राग आणणारे आणखी एक विधान म्हणजे श्रीमान अध्यक्षांनी सांगितले की ते पीएसएल सीझन ९ यूएईमध्ये आयोजित करू इच्छित आहेत कारण पाकिस्तानमध्ये कर आकारणीच्या समस्या आहेत. एकीकडे तुम्ही आशिया चषकाच्या संदर्भात पाकिस्तान क्रिकेटसाठी सुरक्षित असल्याचे सांगत आहात, परंतु दुसरीकडे तुम्ही PSL पाकिस्तानमध्ये आयोजित करू नये असे म्हणत आहात, याचा अर्थ काय आहे?" असा सवाल राजा यांनी केला.   

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. पीसीबी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यासाठी आग्रही आहे, तर आशियाई क्रिकेट परिषद संपूर्ण स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रयत्न करते.

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App