दुबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारतविरोधी विधाने केल्यानंतर अखेर पाकिस्तान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांना उपरती झाली आहे. दुबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर रमीझ राजा यांचा भारताबद्दलचा सूर बदललेला दिसला. बैठकीनंतर राजा म्हणाले की, ‘भारतासोबतचे क्रिकेटचे नाते अधिक वृद्धिंगत करण्याची गरज आहे. खेळात राजकारण नसायला हवे हे माझे मत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट अधिक समृद्ध करण्यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांमधले संबंध चांगले असायला हवेत. यातूनच आपण क्रिकेटमध्ये अधिक प्रगत होऊ शकतो’.
पाकिस्तानमध्ये २०२३ ला ५० षटकांची आशिया चषक स्पर्धा होणार असल्याची माहिती रमीझ राजा यांनी दिली आहे. दुबईत झालेली बैठक आटोपून पाकिस्तानला परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुबईतल्या बैठकी दरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यात सौरव गांगुली आणि जय शहा यांचाही समावेश होता.
राजा पुढे म्हणाले की, ‘आशिया क्रिकेट काऊन्सिलने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी मान्यता दिली आहे. स्पर्धा २०२३ च्या सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यावर सगळ्यांचे एकमत झाले होते. या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या धर्तीवरच आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यास आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. तसेच ही सुनियोजित स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल यावर माझा विश्वास आहे. मला वाटते चाहत्यांनाही हेच हवे आहे.” राजा यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली.
Web Title: Ramiz Raja stresses need to create cricketing bond with Indias BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.