इंदूर : येथे सुरु असलेल्या रणजीच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने दिल्लीविरुद्ध तिस-या दिवसअखेर 233 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. अक्षय वाडकरच्या नाबाद 133 धावांच्या बळावर विदर्भाने अंतिम सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने सात विकेट गमावून 528 धावा केल्या आहेत. अक्षय वाडकरबरोबरच सिद्धेश नेरल 56 धावांवर नाबाद आहे.
तिस-या दिवशी 4 बाद 206 वरून पुढे खेळताना अक्षय वखरे आणि वसीम जाफरची विकेट विदर्भाने 250 धावांपूर्वीच गमावली होती. दिल्लीने सामन्यात पुनरागमन केलं होतं मात्र, अक्षय वाडकर आणि आदित्य सरवटेने दिल्लीच्या बॉलर्सचे मनसुबे उधळून लावले. अक्षय आणि आदित्यनी सातव्या विकेटसाठी 169 धावांची भागिदारी करत विदर्भाला चांगली आघाडी मिळवून दिली. आदित्य सरवटे 79 रन्सवर बाद झाला. त्यानंतर अक्षयने सिद्धेश नेरलसोबत विदर्भाला 500 धावांचा टप्पा गाठून दिला.
अक्षयने शतक झळकावलं तर तर सिद्धशने अर्धशतक लगावत विदर्भाला दिवसअखेर 233 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. आदित्य आणि सिद्धेशने आठव्या विकेटसाठी नाबाद 113 धावांची भागिदारी केली. लोअर मीडिल ऑर्डरने केलेल्या जिगरबाज फलंदाजीमुळं विदर्भाला आता पहिले रणजी विजेतेपद जिंकण्याची चांगली संधी आहे.