नवी दिल्ली : पी. एस. पुनिया याने घेतलेले ५ बळी आणि त्याला सचिदानंद पांडे, दिवेश पठाणिया यांनी दिलेल्या सुरेख साथीच्या जोरावर सेनादलाने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला डाव ३०.२ षटकांत अवघ्या ४४ धावांत गुंडाळला. महाराष्ट्राचा कर्णधार नौशाद शेख याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु हा निर्णय महाराष्ट्राच्या चांगलाच अंगलट आला.पहिल्या चार षटकांतच महाराष्ट्राने ऋतुराज गायकवाड (४), मुर्तुजा ट्रंकवाला (०), कर्णधार नौशाद शेख (०) यांना गमावले. त्यातच अंकित बावणे (६) आणि राहुल त्रिपाठी (६) हे प्रमुख फलंदाजही १७ व्या षटकात धावफलकावर अवघ्या १८ धावा असताना तंबूत परतले. महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छाव (११) आणि विशांत मोरे (१४) हे दोघेच दुहेरी आकडी धावा पार करू शकले.सेनादलाकडून पुनिया याने अवघ्या ११ धावा देत अर्धा संघ बाद केले. त्याला सचिदानंद पांडेने (३/१८) आणि दिवेश पठाणियाने (२/१३) यांनी चांगली साथ दिली. त्यानंतर प्रत्युत्तरात सेनादलाने दिवसअखेर ४ बाद १४१ धावांची मजल मारत पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतली आहे. दिवसअखेर रवी चौहान ४ चौकारांसह ४९ धावा व राहुल सिंग गहलोत २२ धावांवर खेळत आहेत. कर्णधार रजत पालीवाल ७ चौकारांसह ४२ धावांवर बाद झाला. महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचाने ३७ धावांत २, तर मुकेश चौधरी व मनोज इंगळे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.मोहालीत ‘राडा’ : शुभमन गिलची पंचांना शिविगाळशुक्रवारी मोहालीमध्ये सुरु झालेल्या पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यादरम्यान चांगलाच ‘राडा’ झाला. पंजाबचा युवा फलंदाज शुभमन गिलने पंचांनी अबाद दिल्याचा निर्णय न बदलल्याने शिवीगाळ करत मैदान सोडण्यास नकार दिला. गिलच्या अनपेक्षित उद्रेकामुळे पंचांनीही निर्णय बदलला, मात्र यामुळे दिल्ली संघाने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. या नाट्यामुळे दहा मिनिटे खेळ थांबवावा लागला होता.नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सनवीर सिंग व गिल चांगली सुरुवातीच्या प्रयत्नात असताना सनवीर लवकर बाद झाला. यानंतर गुरकिरत मानसोबत गिलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र १० धावांवर असताना पंच मोहम्मद रफी यांनी त्याला बाद ठरविले. सुबोध भाटी याच्या चेंडूवर यष्टिमागे झेल गेनंतरही गिलने मैदान सोडले नाही. यावर पंचांशी त्याची हुज्जत झाली. मैदानी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पंचांनी निर्णय बदलला. त्यानंतर ४१ चेंडूत २३ धावा काढून तो सिमरनजितच्या चेंडूवर बाद झाला.दिल्ली संघाचे व्यवस्थापक विवेक खुराणा म्हणाले, ‘पुढे उभे असलेले पंच मोहम्मद रफी यांनी गिलला झेलबाद ठरविले. त्यावर शुभमनने आक्षेप घेतला. पंचांनी स्क्वेअर लेग पंच पश्चिम पाठक यांच्यासोबत चर्चा करीत हा निर्णय बदलला.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रणजी क्रिकेट: महाराष्ट्र सर्वबाद ४४ धावा; सेनादलाचा धडाका
रणजी क्रिकेट: महाराष्ट्र सर्वबाद ४४ धावा; सेनादलाचा धडाका
पी. एस. पुनियाने घेतले ५ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:06 AM