पुणे : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत सुरू असलेल्या लढतीत शनिवारी छत्तीसगडने महाराष्ट्राला पहिल्या डावात २३९ धावांवर बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राने यजमान संघाची अवस्था ३ बाद २३ अशी नाजूक करीत पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या आशा जीवंत केल्या. अनुपम संकलेचा (८० चेंडूंत ६६ धावा, ११ धावांत ३ बळी) याने दाखविलेली अष्टपैलू चमक आणि राहुल त्रिपाठीचे (१०२) शतक आजच्या दिवसाचे वैशिट्य ठरले.
रायपूर येथील शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत आजपासून सुरू झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या महाराष्ट्राला पहिल्या डावात अपेक्षेनुरूप धावसंख्या उभारता आली नाही. एकवेळ पाहुणा संघ ७ बाद ९१ असा अडचणीत सापडला होता. मात्र, राहुल त्रिपाठी आणि अनुपम संचलेचा यांनी आठव्या गड्यासाठी १०८ धावांची भागिदारी करून संघाला सावरले. महाराष्ट्राचा पहिला डाव अडीचशेच्या आत गुंडाळल्यामुळे उत्साहित झालेल्या छत्तीसगड संघाची दिवसअखेर ३ बाद २३ अशी अवस्था करीत संकलेचाने त्यांची काळजी वाढविली.
संकलेचाने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल करीत पहिल्या दिवसाच्या खेळात जान आणली. त्याने पहिल्याच षटकात सलामीवीर एजी तिवारीला (०) पायचित पकडले. संघाच्या ३ धावा झाल्या असताना अविनाशसिंगच्या (१) रूपात छत्तीसगडला दुसरा धक्का दिला. सातव्या षटकात अभिमन्यू चौहानला बाद करीत त्याने यजमानांची अवस्था ३ बाद १४ अशी केली. यानंतर कर्णधार हरप्रीतसिंग भाटिया (खेळत आहे १३) आणि अजय मंडल (खेळत आहे ४) यांनी आणखी पडझड होऊ
दिली नाही.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र : पहिला डाव : ६८.३ षटकांत सर्व बाद २३९ (राहुल त्रिपाठी १०२, अनुपम संकलेचा ६६, स्वप्नील गुगळे ३५, चिराग खुराणा २०, विशालसिंग ४/५९, पंकज राव ३/३२, अजय मंडल २/४४, ओंकार वर्मा १/६६). छत्तीसगड : १० षटकांत ३ बाद २३ (अनुपम संकलेचा ३/११).
राहुल त्रिपाठीच्या २ हजार धावा पूर्ण
२७ वर्षीय राहुल त्रिपाठीने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सहावे शतक साकारताना १४५ चेंडूंत १ षटकार आणि १४ चौकार लगावले. याबरोबरच त्याने प्रथ श्रेणी क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आज ३०वी धाव घेत त्याने ही कामगिरी केली. ३७व्या सामन्यात त्रिपाठीच्या नावे ६ शतके आणि १० अर्धशतकांसह २०७२ धावा जमा आहेत. संकलेचाने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण करताना ८० चेंडूंत ६६ धावा केल्या. यात २ षटकार आणि १० चौकारांचा समावेश आहे.
चार फलंदाज शून्यावर बाद
स्वप्निल गुगळे (३५)-चिराग खुराणा (२०) यांनी ३६ धावांची सलामी दित्यानंतर अवघ्या १० धावांच्या अंतरात ४ फलंदाज बाद झाल्याने महाराष्ट्राची अवस्था १८व्या षटकांत ४ बाद ४६ अशी झाली. त्यानंतरही ३ फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. भरवशाचा केदार जाधव, कर्णधार अंकित बावणे या स्टार फलंदाजांसह ऋतुराज गायकवाड आणि सत्यजित बच्छाव या चार फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. हे चौघेही झेलबाद झाले.
Web Title: Ranji cricket: Maharashtra vs Chhattisgarh all 239
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.