मुंबई- प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये यंदाच्या रणजी मोसमाची सुरुवात करणाऱ्या बलाढ्य मुंबईने आपल्या पहिल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशचा डाव पहिल्या दिवसअखेर ८९ षटकात ५ बाद २५० असा मर्यादित रोखला. रणजीत पदार्पण करत असलेल्या युवा आकाश पारकरने नियंत्रित मारा करत ४८ धावांत २ बळी घेतले.
इंदूरच्या एमिराल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकरांनी नियंत्रित मारा करत मध्य प्रदेशला ठराविक अंतराने धक्के देण्यात यश मिळवले. सलामीवीर वासिम अहमद (४०) याचा अपवाद वगळता रजत पाटीदार (६), हरप्रीत सिंग भाटीया (२) आणि कर्णधार देवेंद्र बुंदेला (८) फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने मध्य प्रदेशचा डाव अडखळला. हरप्रीत बाद झाल्यानंतर स्थिरावलेला वासिमही बाद झाल्याने यजमानांची कोंडी झाली. यानंतर अनुभवी नमन ओझाने शुभम शर्मासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दिवसभरात चमकदार मारा केलेल्या आकाशने शुभमला बाद करुन मध्य प्रदेशला पाचवा झटका दिला यामुळे यजमानांचा अर्धा संघ १३८ धावांत परतला होता. यावेळी, मुंबईकर यजमानांना झटपट गुंडाळणार असे दिसत होते. परंतु, नमनने एकबाजी लावून धरताना अंकित शर्मासह सहाव्या विकेटसाठी नाबाद ११२ धावांची भागीदारी करुन मध्य प्रदेशची पडझड रोखली. नमन दिवसअखेर ९९ धावांवर नाबाद राहिला असून त्याने २४१ चेंडू खेळताना १३ चौकार व एका षटकाराने आपली खेळी सजवली. दुसरीकडे, त्याला उत्तम साथ दिलेला अंकित ९३ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद ६३ धावांवर खेळत आहे. गोलंदाजीमध्ये आकाशने मुंबईकडून चमक दाखवली. त्याने १७ षटके टाकताना २.८२ च्या सरासरीने ४८ धावांत २ महत्त्वपूर्ण बळी घेत प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला शानदार सुरुवात केली. तसेच रॉयस्टन डायस, अभिषेक नायर आणि विजय गोहिल यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.