मुंबई - गतविजेता मुंबई संघ बुधवारपासून सुरू होत असलेल्या ओडिशाविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा पृथ्वी शॉविना मैदानात उतरेल. त्याचवेळी, एलिट अ गटातील या सामन्यासाठी फलंदाज श्रेयस अय्यर याचे संघात पुनरागमन झाले आहे. तंदुरुस्ती आणि बेशिस्तपणामुळे पृथ्वीला त्रिपुराविरुद्धच्या मागील सामन्यात संघात स्थान देण्यात आले नव्हते. तसेच, अय्यरने वैयक्तिक कारणामुळे या सामन्यातून माघार घेतली होती. हा सामना अनिर्णीत राहिला होता.
मुंबईकर बुधवारपासून बीकेसी येथे ओडिशाच्या आव्हानाचा सामना करतील. बाद फेरीत प्रवेश करण्याच्या आशा उंचावण्यासाठी मुंबईला आता प्रत्येक सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अय्यर, सिद्धेश लाड या प्रमुख फलंदाजांवर संघाची मदार असून शार्दूल ठाकूर, शम्स मुलानी यांचा अष्टपैलू खेळ मुंबईसाठी महत्त्वाचा ठरेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद जुनेद खान याला रणजी पदार्पणाची संधी मिळणार का, हेही पाहावे लागेल. एकीकडे, मुंबई संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असून ओडिशा संघात मात्र कोणीही नावाजलेला खेळाडू नाही. तरी, ओडिशाला कमी लेखणे मुंबईकरांना महागात पडू शकते. कर्णधार गोविंदा पोद्दार आणि बिप्लब समंत्रे यांचा अष्टपैलू खेळ मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ : मुंबई: अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्याश शेडगे, हार्दिक तमोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलानी, कर्ष कोठारी, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान आणि रॉयस्टन डायस. ओडिशा: गोविंदा पोद्दार (कर्णधार), अनिल परिदा, कार्तिक बिस्वाल, राजेश धुपेर, संदीप पटनाईक, सूर्यकांत प्रधान, देबब्रत प्रधान, राजेश मोहंती, हर्षित राठोड, सुनील रॉल, स्वस्तिक समाल, बिप्लब समंत्रे, अनुराग सारंगी, शंतनू मिश्रा, सुमित शर्मा, आशीर्वाद स्वैन आणि तरानी सा.