- उमेश गो. जाधव
पुणे : कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले.
रणजी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करूनही सर्फराज खान याला कसोटी संघात स्थान न दिल्याने महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. अंकितनेही रणजी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया कसोटी संघ निवडताना प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कामगिरीचाच विचार करते, असेही अंकितने सांगितले.
भारतीय संघात अद्याप संधी न मिळाल्याबाबत तो म्हणाला की, मी खूप लहानपणीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आवड होती त्यामुळे स्वतःला झोकून देऊन खेळत होतो. भविष्यात कोणत्या पातळीवर खेळायचे आहे याचा मी कधीही विचार केला नाही. मला हा खेळ आवडतो आणि त्यात आनंद घ्यायचा आहे. भारतीय संघासाठी खेळायचे माझे स्वप्न आहेच. पण कधीकधी उशिरा संधी मिळते. सर्वांनाच ती वेळेवर किंवा वेळेच्या आधी मिळते असे नाही. तुम्ही मेहनत केली आहे. तुमच्या कामगिरीत सातत्य असेल तर तुम्हाला नक्कीच संधी मिळते. एक खेळाडू म्हणून संघात निवड होणे हे माझ्या हातात नाही. बॅट घेऊन मैदानावर उतरायचं आणि धावा करून संघाला विजय मिळवून द्यायचा एवढंच मी करू शकतो. त्यामुळे साहजिकच कामगिरीवरच मी अधिक लक्ष देतो.
अशी कामगिरी करणारच भारतीय संघात खेळणे हेच माझे लक्ष्य आहे. त्यामुळेच मी देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येच अशी कामगिरी करायची आहे की निवड समितीला माझे नाव आले की निवड करण्यासाठी विचारच करायला लागू नये. तेव्हाच माझे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही प्रकारात खेळण्यास सक्षम असल्यामुळे भारतासाठी नक्कीच खेळेन, विराट कोहली हा मला सतत प्रेरणा देतो. त्याची धावांची भूक कधीच संपत नाही.
लीग क्रिकेटबाबत तो म्हणाला की, कर्नाटक, तामिळनाडू येथील लीगमध्ये खेळणारे अनेक खेळाडू पुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्रातील गुणी खेळाडू लीगच्या माध्यमातून पुढे आयपीएलमध्ये जातील, असा विश्वास आहे. स्वत:च्या कौशल्याबाबत तो म्हणाला की, लहानपणापासून मी माझ्या कौशल्यावर खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे परिस्थिती खराब असली तरी मला फलंदाजी करताना अडचण येत नाही. क्रिकेट खेळताना आईवडिलांनी खूप पाठिंबा दिला. त्यांनी दुसरे करिअर माझ्यावर लादण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. माझ्यावर त्यांचा विश्वास होता त्यामुळेच मी आज येथे आहे.