- नीलेश देशपांडे
इंदूर : वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना हॅट्ट्रिक पूर्ण करीत इतिहास नोंदवला. रणजी स्पर्धेच्या इतिहासात अंतिम सामन्यात दुसरी तर एकूण ७६ वी हॅटट्रिक आहे. कर्णधार फैज फझल व वसीम जाफर यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित दिल्लीविरुद्ध इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या अंतिम लढतीत शनिवारी दुस-या दिवशी विदर्भाला पहिल्या डावात ४ बाद २०६ धावांची मजल मारुन दिली. आज दुस-या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी वसीम जाफर (नाबाद ६१) आणि अक्षय वखरे (०) खेळपट्टीवर होते. विदर्भाला दिल्लीची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ८९ धावांची गरज असून सहा विकेट शिल्लक आहेत. तिसºया दिवशी दिल्लीच्या गोलंदाजांवर सामन्यावर पकड मिळवण्याचे दडपण राहील. त्यांची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
कालच्या ६ बाद २७१ धावसंख्येवरुन पुढे खेळताना शनिवारी दिल्लीच्या तळाच्या फळीतील फलंदाजांना गुरबानीच्या माºयाला तोंड देता आले नाही. त्याने सातवेळा जेतेपद पटकावणाºया दिल्ली संघातील तळाच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूंवर तंबूचा मार्ग दाखविला. गुरबानी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये हॅट््ट्रिक नोंदविणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी तामिळनाडूच्या के.बी. कल्याणसुंदरमने १९७२-७३ मुंबईविरुद्ध अशी कामगिरी केली होती. दिल्लीने अखेरच्या चार विकेट केवळ पाच धावांच्या मोबदल्यात गमावल्या.
गुरबानीचे बळी
गुरबानीने विकास मिश्रा, नवदीप सैनी व शोरे यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. त्याची हॅट्ट्रिक निर्णायक ठरली आणि विदर्भने जबरदस्त पुनरागमन करताना सामन्यावर वर्चस्व मिळवले.
आम्ही पुनरागमन करू : सुदन
आम्ही लढवय्या खेळ करीत पुनरागमन करू, असा विश्वास दोन बळी घेणारा दिल्ली संघाचा वेगवान गोलंदाज आकाश सुदन याने
व्यक्त केला.
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत शनिवारी दुस-या दिवशी विदर्भाला पहिल्या डावात ४ बाद २०६ धावांत रोखल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सुदन म्हणाला, ‘सध्या आमची स्थिती चांगली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या चार फलंदाजांना तंबूत परतवले असून त्यांना २९५ धावांच्या आत रोखण्याचे लक्ष्य आहे.’
पहिल्या दिवशीच्या तुलनेत खेळपट्टीच्या स्वरुपात बदल झाला आहे. चेंडू वळत असून बॅटवर येत आहे. आमची गोलंदाजीची बाजू चांगली आहे, असेही सुदनने सांगितले.
रजनीश गुरबानीची प्रशंसा करताना सुदन म्हणाला की, ‘त्याने नक्कीच चांगला मारा केला. त्याने चांगली दिशा व टप्पा राखून वेगवान मारा केला. त्याचे चेंडू दोन्ही बाजूला स्विंग होत होते.’
हॅट््ट्रिकबाबत कल्पना नव्हती : गुरबानी
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीला हॅट््ट्रिक घेतल्याची कल्पनाच नव्हती. गुरबानी म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला हॅट््ट्रिक झाल्याची कल्पनाच नव्हती. पाचव्या व सहाव्या चेंडूंवर दोन बळी घेतल्यानंतर मी पुढचे षटक टाकण्यासाठी जात असताना प्रेक्षकांमधून कुणीतरी हॅट््ट्रिकबाबत ओरडले. त्यावेळी मला हॅट््ट्रिकची कल्पना आली.’ हॅट््ट्रिकसाठी मी कुठलाही विचार केला नव्हता, पण चेंडू यष्टिच्या रोखाने करण्याचा प्रयत्न होता व परमेश्वराने हॅट््ट्रिकचे दान माझ्या झोळीत टाकले.’
संक्षिप्त धावफलक :
दिल्ली (पहिला डाव) : सर्वबाद २९५ धावा (ध्रुव शोरे १४५, हिम्मत सिंग ६६; रजनीश गुरबानी ६/५९, आदित्य ठाकरे २/७४).
विदर्भ (पहिला डाव) : ४ बाद २९६ धावा (फैझ फझल ६७, वसीम जाफर खेळत आहे ६१; आकाश सुदन २/५३).
Web Title: Ranji final: Gurbani made history with hat tricks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.