बंगळुरू : दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केलेल्या यशस्वी जैस्वालच्या विक्रमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी चषक उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध पूर्ण वर्चस्व मिळवताना चौथ्या दिवसअखेर एकूण ६६२ धावांची आघाडी घेतली. यासह मुंबईच्या अंतिम फेरीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता राहिली आहे. पहिल्या डावात १०० धावा केलेल्या यशस्वीने दुसऱ्या डावात ३७२ चेंडूत २३ चौकार व एका षटकारासह १८१ धावांची फटकेबाजी केली. मुंबईने दुसऱ्या डावात १४० षटकात ४ बाद ४४९ धावा केल्या.रणजी सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकणारा यशस्वी नववा मुंबईकर ठरला. मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्यानंतर उत्तर प्रदेशला १८० धावांमध्ये गुंडाळत २१३ धावांची आघाडी घेतली. यानंतर कर्णधार पृथ्वी शॉने मुंबईला आक्रमक सुरुवात करून देताना ७१ चेंडूत ६४ धावा केल्या. पृथ्वी बाद झाला तेव्हा मुंबईच्या ६६ धावा झाल्या होत्या हे विशेष. अत्यंत संथ सुरुवात केलेल्या यशस्वीने पहिली धाव घेण्यासाठी तब्बल ५४ चेंडू खेळले. परंतु, यानंतर जम बसल्यावर मात्र त्याने उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यशस्वीला अरमान जाफरची चांगली साथ मिळाली. अरमानने २५९ चेंडूंत १५ चौकार व २ षटकरांसह १२७ धावा चोपल्या. दोघांनी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना दमवताना दुसऱ्या गड्यासाठी २८६ धावांची भक्कम भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक मुंबई (पहिला डाव) : १४०.४ षटकांत सर्वबाद ३९३ धावा.उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ५४.३ षटकांत सर्वबाद १८० धावा (शिवम मावी ४८, माधव कौशिक ३८, करण शर्मा २७; तुषार देशपांडे ३/३४, तनुष कोटियन ३/३५, मोहित अवस्थी ३/३९.)मुंबई (दुसरा डाव) : १४० षटकांत ४ बाद ४४९ धावा (पृथ्वी शॉ ६४, यशस्वी जैस्वाल १८१, अरमान जाफर १२७; प्रिन्स यादव २/६९, शिवम मावी १/३६, सौरभ कुमार १/१०५.)
बंगालची स्थिती नाजूकअलूर : मध्य प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या रणजी स्पर्धेच्या अन्य उपांत्य सामन्यात बंगालची स्थिती नाजूक झाली आहे. मध्य प्रदेशने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगालची चौथ्या दिवसअखेर ३७ षटकांमध्ये ४ बाद ९६ धावा अशी अवस्था झाली. प्रमुख फलंदाज मनोज तिवारी केवळ ७ धावांवर बाद झाल्याने बंगालच्या संघात चिंतेचे वातावरण आहे. कुमार कार्तिकेयने ३५ धावात ३ प्रमुख बळी घेत बंगालच्या फलंदाजीला खिंडार पाडले.